डॉ.रमेश बी. परब जिल्हा भरातील रुग्णांचे आधारस्तंभ…

डॉ.रमेश बी. परब जिल्हा भरातील रुग्णांचे आधारस्तंभ…

विशेष संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाचे वरदान लाभलेलं स्वप्नवत जिल्हा. जिल्ह्यातील शेती, बागायती उत्पन्नातून आपली रोजीरोटी चालविणारे शेतकरी, कष्टकरी लोकांचा सधन जिल्हा. जोपर्यंत नैसर्गिक शेती होत होती तोपर्यंत कोकणात रोगराईचे प्रमाण अत्यल्प होते, परंतु रासायनिक खते आणि कष्टाची कामे जसजशी कमी झाली तसतसे जिल्ह्यात देखील आजारांचे प्रमाण वाढले. रोगी वाढले परंतु त्यांवर उपचार करण्यासाठी तेवढ्याच ताकदीचे डॉक्टर मात्र जिल्ह्यात उपलब्ध नव्हते. त्याचवेळी कुडाळ येथे जिल्ह्यातीलच परंतु के.ई.एम. रुग्णालय मुंबई येथे कार्यरत असलेले डॉ.रमेश बी. परब यांनी राजन हॉस्पिटल नावाने अतिदक्षता विभागासह खाजगी रुग्णालय सुरू केले. डॉ.रमेश परब यांच्या रूपाने जिल्ह्याने डॉक्टर म्हणून एक देवमाणूस पाहिला.
डॉ.रमेश परब यांनी कुडाळ येथे रुग्णालय सुरू केले आणि जिल्ह्याभरातील अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. डॉ. परब यांची ओपीडी म्हणजे एक गजबजलेली जागा. दिवस कोणताही असो, तिथली गर्दी कधीच कमी होत नाही. सकाळी ९.३० वाजता सुरू होणारी ओपीडी बंद होण्याची वेळ सांगता येत नाही एवढे रुग्ण डॉ.परब यांच्यावरील विश्वासा खातीर त्यांच्याकडे तपासणीसाठी येतात. दुपारी काही वेळ बंद असलेली ओपीडी संध्याकाळी ४.३० वाजता पुन्हा सुरू होते ती रात्री ७.३० पर्यंत सुरूच असते. परंतु त्यानंतर रात्री अपरात्री किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील अत्यवस्थ, गरजू रुग्ण डॉ.परब यांच्या रुग्णालयात आला तर तत्काळ ते त्यांच्यावर उपचार करतात.
डॉ.परब हे अत्यंत शिस्तीचे तसेच तापत स्वभावाचे अशी समज आहे. परंतु जे खरोखरच डॉ.परब यांना ओळखतात त्यांनाच माहिती आहे.डॉ. परब हे शिस्तीचे असले तरी हसतमुख, मिश्किल स्वभावाचे आहेत. गोरगरीब रुग्णांची आस्थेने विचारपूस करून आपल्याकडून जेवढं काही त्यांच्यासाठी करता येईल तेवढा प्रयत्न ते करतात. एकदा एक म्हातारी व्यक्ती एकटीच तपासणीसाठी आली होती, तपासणीनंतर तिची अवस्था थोडी चिंताजनक होती, त्यावेळी डॉ.परब यांनी नोकरीवर गेलेल्या तिच्या मुलाला रुग्णालायत बोलावून नंतरच त्या म्हाताऱ्या आईला मुलासोबत पाठविले आणि पुन्हा तपासणीला येताना आईच्या सोबत येण्याचे फर्मान सोडले. त्यातून त्यांची आपल्या रुग्णांप्रति असलेली आत्मीयता दिसून येते. रुग्णांकडे असलेल्या पैशानुसार देखील ते औषधे घेण्याचे सांगतात त्यामुळे अनेक गोरगरिबांना डॉ. परब हे आधारवड वाटतात. त्यामुळेच अमर्यादित रुग्ण त्यांच्याकडे तपासणीसाठी येतात.
डॉ.परब यांच्या रुग्णालयातसर्वच प्रकारचे रुग्ण येतात. जनरल फिजिशियन म्हणून ते अनेक रोगांच्या रुग्णांवर उपचार करतात. हृदयरोग, डायबेटीस, पक्षाघात, अस्थमा, सर्दी ताप बरोबरच न्यूरॉलॉजि, डरमॅटोलॉजि, गॅस्ट्रोइंटरॉलॉजि आदी प्रकारच्या रुग्णांवर ते उपचार करतात. आपले काम म्हणून नव्हे तर आपले कुटुंब म्हणून ते रुग्णसेवा देतात. ज्या रुग्णांना आपल्याकडे उपचार उपलब्ध नसतील त्यांना त्यांच्या सोयीने योग्य त्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देखील ते देतात. आपल्या शिस्तीसाठी ते जेवढे प्रसिद्ध आहेत त्यापेक्षा जास्त आपल्या उपचारासाठी आणि माणुसकीसाठी देखील डॉ.रमेश परब ओळखले जातात.
डॉ.रमेश परब यांच्या दिवस-रात्र सेवेमुळे अनेकांना जीवदान मिळालं आहे. गूगल वर देखील डॉ.परब यांचे रुग्णालय शोधलं असता अनेकांनी त्यांच्या रुग्णसेवेला आणि रुग्णालयातील त्यांच्या उपचारासाठी, माणुसकीसाठी ⭐⭐⭐⭐⭐ स्टार रेटिंग दिलेले आहे. लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या बोलक्या प्रतिक्रियांतूनच डॉ.परब यांचे कर्तृत्व दिसून येते. रुग्णालयातील प्रेमळ कर्मचारी वर्ग, गेली अनेकवर्षं त्यांच्याकडे नर्स म्हणून काम करणाऱ्या युवती, महिला पाहिल्या की लक्षात येते ते की डॉ. परब यांच्यावरील प्रेमाखातरच कर्मचारी वर्षानुवर्षे तिथे काम करतात. वरून कठोर शिस्तप्रिय दिसणारे डॉ.रमेश परब हे आतून मात्र प्रेमळ, माणुसकीने ओतप्रोत भरलेले आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्यास संवाद मीडियाचा सलाम. भविष्यात त्यांच्याकडून जिल्हावासीयांना अशीच उत्तम सेवा मिळत राहो याच सदिच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा