You are currently viewing कोंकण रेल्वे फक्त नावसाठीच “कोंकण” का?
को. रे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी के सावंत.

कोंकण रेल्वे फक्त नावसाठीच “कोंकण” का?

कोंकण रेल्वेच्या समस्या…आणि आंदोलनाचा उपाय…

कोंकण रेल्वे सुरू होऊन काळ लोटला, तरीसुद्धा कोंकण रेल्वे मार्गावरील समस्या काही सुटता सुटत नाहीत. मुळात कोकणाला झुकतं माप देण्याचा कधी प्रयत्नही होत नाही आणि तशी कोणाही कोंकण रेल्वे अधिकाऱ्यांची, प्रशासनाची मानसिकता दिसत नाही.
कोंकण रेल्वे सुरू करण्यासाठी कित्येक भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांना आशा होती कोंकण रेल्वेमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळतील, परंतु अजूनही बरेच भूमिपुत्र जमिनी देऊनही उपेक्षितच राहिलेत.
एवढं सर्व असूनही कोंकण रेल्वे नावाने सुरू झालेली ही रेल्वे दिल्ली, मुंबई, राजस्थान, गुजरात पासून केरळ पर्यंत विस्तारित झाली. अनेक लांब पल्ल्याच्या साध्या तसेच वातानुकूलित एक्सप्रेस गाड्या धावू लागल्या. परंतु इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कोकणातील लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जात नाहीत का? आणि जर जातात तर कोकणातील बहुतांश रेल्वे स्टेशनवर या गाड्यांना थांबा का दिला जात नाही?
काही गाड्यांना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही. सावंतवाडी टर्मिनस ची घोषणा झाली, कामही अर्धवट झालं, परंतु गाड्या मात्र थांबत नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्या जणू काय केरळ, दिल्ली, राजस्थान, गुजरात येथील लोकांसाठीच सुरू आहेत अशाच अविर्भावात कोकण रेल्वे प्रशासन वागतं.
गेल्या वर्षी प्रवासी को. रे. संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत वगैरेनी कोंकण रेल्वेच्या समस्या आणि सावंतवाडी स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं. त्यावेळी माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कोंकण रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलून गाड्या थांबविण्याचे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करायला लावलेलं. परंतु कोंकण रेल्वे प्रशासनाने आपल्या वचनाला न जागता प्रायोगिक तत्वावर जनशताब्दी एक्सप्रेस ही एकमेव गाडी सावंतवाडी स्टेशनवर थांबवून आंदोलकांच्या आणि पर्यायाने प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली.
दररोज होणारे हे फसवणुकीचे प्रकार आणि कोंकण रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रवाशांच्या समस्या याची साधी दखलही कोंकण रेल्वे प्रशासन घेत नाही, त्या झोपलेल्या कुंभकर्ण रुपी रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि ह्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी कोंकण रेल्वे मार्गावर येत्या 1 मे 2020 रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणारं असल्याचं आजच्या कोंकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या एल्गार परिषदेत निश्चित करण्यात आलं.
सिंधुदुर्ग रत्नागिरी सह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील कोंकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक दादरच्या मराठा समाज हॉलमध्ये झाली. त्यात खेड, वैभववाडी, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी, तसेच डहाणू-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, सकाळी दादर-रत्नागिरी, रात्री दादर-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी या गाड्या चालू करण्यासाठी, व गेली कित्येक वर्षे खोळंबलेल्या मागण्या बाबत निर्णय घेण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या एल्गार परिषदेस सावंतवाडी पासून डहाणू पर्यंतचे प्रवासी संघटना प्रतिनिधी हजर होते.
को. रे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी के सावंत यांनी कोंकण रेल्वे प्रशासनाकडून आलेल्या नकार पत्राचा खरपूस समाचार घेतला, तसेच रेल्वेचे अधिकारी करत असलेल्या मनमानी विरुद्ध पेटून उठून संघर्ष करण्याचा निर्धार केला.
या एल्गार परिषदेस नितीन गांधी, सुनील उत्तेकर, अभिमन्यू लोंढे, भाई देऊलकर, अमोल सावंत, विनोद रेडकर, शांताराम नाईक, संतोष पाटणे, प्रशांत परब, एस बी राणे, धनंजय शिंदे, रमेश सावंत, इत्यादी विविध प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी कोंकण रेल्वेकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.
एल्गार परिषदेस जमलेल्या सर्वांकडून एकमताने कोंकण रेल्वे प्रशासनास वठणीवर आणण्यासाठी धडा शिकविण्यासाठी रेल रोको करण्याचे ठरविण्यात आले. तत्पूर्वी रेल्वे प्रशासनास शेवटचा निर्वाणीचा इशारा म्हणून 26 जानेवारी 2020 रोजी कोंकण रेल्वे मुख्यालय, बेलापूर, नवी मुंबई येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 10 =