You are currently viewing सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन..

सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री नाम.दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने भरविलेले विज्ञान प्रदर्शन गेले तीन दिवस विशेष चर्चेचे व आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. सावंतवाडीतील या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शासनाचा 2 कोटी 56 लाख रुपये निधी खर्ची पडल्याचे नाम.दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय मुलांना जेवण व एसटी बसची मोफत व्यवस्था त्याचप्रमाणे ज्या शाळेत शाळांच्या स्कूलबस आहेत त्यांना भाडे देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या मुलांनी सदरच्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला.

*प्रदर्शनाच्या ठिकाणी मुलांची जेवणाची व्यवस्था पण मुलांना स्वखर्चाने खावा लागला वडापाव..??*

सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या मुलांना शासनाकडून मोफत प्रवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु जेवणाची व्यवस्था असूनही काही मुलांना स्वखर्चाने वडापाव खावा लागला तर काही मुलांजवळ पैसे नसल्याने शिक्षकांनी त्यांना खाऊ दिले. याबाबत प्रदर्शनासाठी आलेल्या काही शिक्षकांनी संवाद मीडियाच्या प्रतिनिधीचे लक्ष वेधले होते. संवाद मीडियाच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट दिली असता, जिल्ह्यातील पहिल्या दोन शाळांच्या मुलांना जेवणाची पाकिटे मिळाली होती, परंतु त्यानंतर रांगेत उभे राहणाऱ्या मुलांना जेवण संपल्याचे सांगण्यात आले. परिणामी नाविलाजास्तव मुलांनी स्वखर्चाने वडापाव विकत घेऊन पोटाची भूक भागवली. शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची घातला असताना देखील विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या शाळकरी मुलांना भूक भागवण्यासाठी स्वखर्चाने वडापाव खाण्याची पाळी का आली..? याकडे शासनाच्या जबाबदार अधिकारी व शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री नाम.दीपक केसरकर यांनी गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक वाटते आहे. शासनाकडून कोट्यावधीचा निधी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी खर्ची घातला गेला परंतु जर त्यातून विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या मुलांनाच पोटाची भूक भागविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करावा लागत असेल तर शासनाचा निधी नक्की खर्ची गेला कुठे..?

विज्ञान प्रदर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या अधिकारी, मंत्र्यासंत्र्यांची बडदास्त ठेवण्यासाठी निधी खर्ची पडला की निधीचा आकडाच केवळ कोटीच्या कोटी उड्डाणे घेत होता..?? साहजिकच असे अनेक प्रश्न पालक व शिक्षकांच्या मनात उत्पन्न झाले आहेत.

*पालक – शिक्षकांनी केला जीवाचा गोवा..??*

सावंतवाडीत भरविलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामुळे सावंतवाडीसह जिल्ह्यातील आजूबाजूच्या तालुक्यांमध्येही हॉटेल्स बुकिंग फुल्ल असल्याचे संवाद मीडियाच्या प्रतिनिधीने सावंतवाडीतील हॉटेल व्यवसायिकांशी संवाद साधल्यानंतर कळून आले. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी राज्यभरातून मुलांबरोबरच केवळ शिक्षकच नव्हे तर मुलांचे पालक देखील सावंतवाडीत दाखल झाले होते. काहींनी कोकण पहिल्यांदाच पाहिलं, त्यामुळे त्यातील कित्येकांनी जिवाचा गोवा करण्याचेही पसंत केले. याला काही शाळांचे शिक्षकही अपवाद नव्हते हे विशेष..! संवाद मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार प्रदर्शनासाठी दाखल झालेले काही शिक्षक सायंकाळी जिवाचा गोवा करण्यासाठी गोवा येथे जात असत व रात्री अपरात्री सावंतवाडीत दाखल होऊन लॉजिंग बोर्डिंगचे दरवाजे ठोठावत असायचे. त्यामुळे विज्ञान प्रदर्शनाच्या नावावर राज्यभरातून आलेल्या काही पालक व शिक्षकांनी जिवाचा गोवा करत विज्ञान प्रदर्शनाच्या आडून वेगळे क्षण अनुभवल्याचे दिसून आले.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी मुलांनी केलेली तयारी, प्रोजेक्ट नक्कीच उल्लेखनीय होते. अनेक मुलांनी विविध विषयांवर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले प्रोजेक्ट वाखण्याजोगे होते, त्यामुळे मुलांचे अनेकांकडून कौतुक केले गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + three =