You are currently viewing कणकवलीतील बॉक्सवेलच्या जाग्यावर १००% फ्लाय ओव्हर ब्रिज होणार…..

कणकवलीतील बॉक्सवेलच्या जाग्यावर १००% फ्लाय ओव्हर ब्रिज होणार…..

कणकवली : ​
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्गात अंतिम टप्प्यात आले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामासंदर्भात टास्क फोर्स च्या माध्यमातून प्रश्न सोडवले जात असल्याची माहिती भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली. सिंधुदुर्गात हायवेच्या चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील हायवेच्या ​ बॉक्सवेलच्या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणचे ब्रिज हटवून त्याजागी गर्डर टाकून फ्लाय ओव्हर ब्रिज करण्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

येत्या काळात ​१००% बॉक्सवेलचा भाग काढून तेथे ​२ पिलर वर फ्लायओव्हर ब्रिज होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कोरोनामुळे देशभरात अनेक विकासकामांचे फंड आरोग्याच्या बाबीवर वळविण्यात आले. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे ​४० कोटी काय ​४०० कोटी लागले तरी हे काम होईल असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला.

कणकवलीत पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, ओबीसीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष नरेंद्र गावकर, क्रीडा भारती अध्यक्ष रवी करमळकर, नगरसेवक शिशीर परुळेकर, उपस्थित होते. जठार पुढे म्हणाले, परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणाचा प्रश्न रखडलेला होता. परशुराम घाटातील जमीन मालक व परशुराम देवस्थानचे ट्रस्टी यांच्यात समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. तेथे आता चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. शास्त्री पुलाचे काम रखडले तेही मार्गी लावण्यात यश आले आहे.

संगमेश्वर मध्ये ​४५ मीटर भूसंपादन करण्यात आले होते. मात्र शास्त्री पुलाचे स्ट्रक्चर बदलल्याने येथे ​६० मीटर भूसंपादनाची आवश्यकता भासत होती. त्याबाबतही मार्ग काढण्यात आला असून ​४५ मीटरमध्ये तेथे काम करण्यात येत आहे असे जठार म्हणाले. भारत बंद हा विषय कोकणात व मुंबईत फेल गेल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारने कृषी विषयक तीन कायदे आणले. त्यात थेट माल ग्राहकाकडे गेला तर दलालांचा फायदा कमी होत असल्यामुळे दलालांनी भारत बंद चा पर्याय निवडला. महा विकास आघाडीचे प्रणेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रात एपीएमसी मार्केट बंद व दलालांची साखळी तोडण्याबाबत समर्थन करण्यात आले. दलाल माजल्यामुळे भारत बंद चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी जवान व किसान असल्यामुळेच कोकण व मुंबईत भारत बंद चा फज्जा उडाल्याची टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार जर ठेकेदाराने अटी-शर्ती पाळल्या नाहीत तर त्याला शिक्षा होऊ शकते. यामुळे दलालांचे धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून हे बिल आणण्यात आले. त्याला शेतकऱ्यांकडूनही पाठिंबा मिळायला हवा असे श्री जठार यांनी सांगितले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे ​१८ ते ​२० डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ​२० डिसेंबर रोजी दौऱ्यात संदर्भातील नियोजनाच्या बाबी मध्ये माझ्यावर एक दिवसाचा दिन प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणाचा हा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील जनतेचे आभार मानायला हवेत, कारण सिंधुदुर्गातील जनतेने महामार्ग चौपदरीकरणाला जे सहकार्य केले त्यामुळेच हे काम वेगाने पूर्ण होण्याच्या दिशेने गेल्याचे जठार यांनी सांगितले.

जनता विकास कामांबाबत प्रगल्भता दाखवते मात्र तिच प्रगल्भता खासदारांकडे नसल्याची टीका त्यांनी केली. जर रिफायनरी प्रकल्प झाला असता तर आज रोजगारा संदर्भात कोकणातल्या तरुणींवर उपासमारीची वेळ आली नसती. रोजगाराच्या नावाने लोक आक्रोश करतात. जनतेकडे शहाणपण आहे मात्र निवडून दिलेल्या खासदाराकडे नाही अशी टीका त्यांनी केली. खासदार प्रकल्प हवा की नको ते ठरवत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी यांबाबत अधिसूचना काढावी मग जनतेला ठरवू दे प्रकल्प हवा की नको असे जठार म्हणाले. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या व्हीजनमूळे मुंबई गोवा जोडणारा महामार्गाचे काम झाले. मुंबई आर्थिक राजधानी असताना महामार्गाच्या कामामुळे कोकण देशाची पर्यटनाची राजधानी बनली असती. मात्र खासदारांनी कोकणाच्या या दृष्टीने विरोधी भूमिका घेतल्याची टीका जठार यांनी केली.

नानार प्रकल्प करा व या प्रकल्पाच्या रोजगार भरती चे प्रमुख खासदार विनायक राऊत यांना करा. व भरती वेळी सर्वप्रथम भरती शिवसेनेच्या लोकांची करा असेही आवाहन जठार यांनी केले. माझ्यावर दलालीचे आरोप करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना मी आरोप सिद्ध करा अन्यथा कणकवली पटवर्धन चौकात माफी मागा असे प्रति आव्हान दिल्यानंतर खासदारांचे तोंड बंद झाले. त्यानंतर खासदारांनी मान्य केले की मातोश्रीचे जवळचे नातेवाईकांच्या नाणार प्रकल्पांमध्ये जमिनी आहेत. मग आता खासदारांनी जाहीर करावे की यात दलाली कोणी केली? नानार प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात येणाऱ्या प्रकल्पाला विरोध करून कोकणाच्या डोक्यावर पाप का ठेवले गेले असा सवाल जठार यांनी केला.

खासदार विनायक राऊत हे पाप आम्हीच आणले. मात्र ​२०२४ च्या निवडणुकीत आम्ही हे पाप निश्चितच दूर करू असा टोला त्यांनी लगावला. ​​आयुर्वेदिक रिसर्च सेंटर लातूरला नेले जाते मात्र त्याला जागा उपलब्ध करण्यासाठी आमदार वैभव नाईक व दीपक केसरकर यांचे तोंड बंद का असा सवाल जठार यांनी केला. मुख्यमंत्री, खासदार व शिवसेनेचे आमदार हे कोकण विरोधी असून, सत्ताधारी शिवसेना कुंभकर्ना सारखी झोपली आहे अशी टीका त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − 2 =