You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे क्रांतीदिना निमित्त क्रांतिकारकांना मानवंदना

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे क्रांतीदिना निमित्त क्रांतिकारकांना मानवंदना

सावंतवाडी प्रतिनिधी:-

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे काल ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त डेगवे येथील क्रांतिकारक केशव गोविंद गवस – देसाई व देवु नाईक-हळदणकर यांना फाशी दिली होती त्या जागेच्या ठिकाणी असलेल्या काजार्‍याच्या वृक्ष स्मृतीला भेट देत अभिवादन केले व त्यांना मानवंदना दिल्या.देशात क्रांतीची सुरुवात खऱ्या अर्थाने कोकणातून आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून झाली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या दोन क्रांतिकारकांनी इंग्रज राजवटीला नामोहरम केले होते त्यांच्या आठवणी जागवणे आणि नव्या पिढीसमोर हा इतिहास क्रांती दिनाच्या निमित्ताने उजेडात आणणे या हेतूने आज आगळ्यावेगळ्या पद्धतीने क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद तर्फे डेगवे येथील श्री देव थापेश्वर देवस्थान मंदिर जवळ केशव गवस-देसाई यांच्या स्मृती जागवण्यासाठी तेथे असलेल्या फलक तर शहीद क्रांतिकारक देवू हळदणकर-नाईक यांच्या स्मृती काजार्‍ याचा वृक्ष ज्या ठिकाणी फाशी दिली त्या ठिकाणी असलेल्या फलकाला इतिहासकार कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.जी. ए. बुवा व सरपंच राजन देसाई, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष श्री.संतोष सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, माजी तालुकाध्यक्ष सुभाष गोवेकर, प्रा.रुपेश पाटील, रामदास पारकर, स्वातंत्र्य सैनिक साहित्यिक एस. आर. सावंत, बांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी.बी.वारंग, माजी सरपंच मधुकर देसाई, प्रवीण देसाई, राजेश देसाई, उत्तम देसाई, भरत देसाई, लाडोबा देसाई, श्री.फणसीकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे केले कौतुक*

“या दोन्ही महान क्रांतिवीरांना कोकण मराठी साहित्य परिषदेने आमच्या गावात येऊन मानवंदना दिल्या आणि अभिवादन कार्यक्रम केला खरंच हे कौतुकास्पद आहे” अशा शब्दात सरपंच श्री.देसाई यांनी गौरवोद्गार काढले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने अशा महान क्रांतिवीरांच्या आठवणी जागवल्या जातील आणि नव्या पिढीसमोर आपल्या भागाचा हा इतिहास ठेवला जाईल. त्यासाठी निश्चितपणे स्वातंत्र्य सैनिक व क्रांतीवीरांची यादी तयार करून त्यांचा गौरव केला जाईल असे तालुकाध्यक्ष श्री. सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी सहसचिव राजू तावडे व प्रा.डॉ. जी.ए. बुवा यांनी या दोन महान क्रांतिवीरांचा इतिहास स्पष्ट केला. अशा पद्धतीने कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनोखा असा क्रांती दिन क्रांतिवीरांच्या गावात जाऊन त्यांच्या आठवणी, स्मृतींना जागृत करून मानवंदना देत नव्या पिढीसमोर हा नवा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

*इंग्रज राजवटीच्या विरोधात देशात पहिली क्रांती १८४४ मध्ये बांदा, ता.सावंतवाडी येथे झाली*

इंग्रज राजवटीविरुद्ध देशात पहिली क्रांती १८५७ मध्ये झाली. मात्र डेगवे (ता. सावंतवाडी) येथील केशव गोविंद गवस – देसाई या क्रांतिकारकाने १८४४ मध्ये बांद्यात पहिला इंग्रज अधिकारी लॉर्ड विल्यम फावरे (२२) याला जीवे मारून इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या क्रांतीची नोंद केली.

 

*बांदा कट्टा कॉर्नर येथे लॉर्ड विल्यम फावरेचे स्मारक थडग्याच्या स्वरूपात…..परंतु क्रांतीची ठिणगी पेटविणाऱ्या गवस – देसाईंचे स्मारक नाहीच पण इतिहासात नावही नाही*

बांदा शहरात गजबजलेल्या कट्टा कॉर्नर चौकात फावरे यांचे थडगे झाडाझुडपांच्या विळख्यात अखेरची घटका मोजत आहे. जुलमी इंग्रज अधिकाऱ्याला यमसदनी पाठवून केलेल्या पराक्रमाचे स्मारक व त्या अनुषंगाने केशव गवस – देसाई यांचा पराक्रम देखील कालौघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डेगवे येथील बोलभाषा आणि तळकोकण पर्यटन संस्थेने हा इतिहास पुढील पिढीला समजावा यासाठी हे स्मारक स्वखर्चाने जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील अनेक स्वातंत्रसैनिक, क्रांतिकारकांनी भारताच्या स्वतंत्र लढ्यात मोलाची भूमिका बजाऊनही त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला नाही.

इंग्रजांविरुद्ध देशात पहिली क्रांती १८५७ मध्ये झाली. या स्वातंत्रसंग्रामातील एक सुवर्ण पान डेगवे गावाच्या नावावर आहे. १९५७ पूर्वी तेरा वर्षे आधी म्हणजेच १८४४ मध्ये जुलमी इंग्रज अधिकारी लॉर्ड विल्यम फावरे यांचा डेगवेचे सुपुत्र केशव गोविंद गवस – देसाई यांनी गोळ्या घालून वध केला. बांदा येथे घडलेल्या या क्रांतिकारकाच्या पराक्रमाची गाथा आहे. फावरे यांचे स्मारकच इतिहासाची साक्ष आहे. २९ मार्च १८५७ मध्ये क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीत बॉम्बस्फोट घडवून स्वतंत्र लढ्याची पहिली ठिणगी पडल्याची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे गवस-देसाई हे एका इंग्रज अधिकाऱ्याला मारणारे पहिले क्रांतिकारक ठरू शकतात. त्या इंग्रज अधिकाऱ्याची समाधी शहरातील कट्टा कॉर्नर चौकात असून त्यावर १८४४ साल असा उल्लेख आहे. त्या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचे थडग्याच्या रुपात स्मारक उभारण्यात आले; पण देशभरात पहिल्यांदा क्रांतीची ठिणगी पेटविणाऱ्या गवस-देसाई यांचे स्मारक सोडाच, पण त्यांचे इतिहासात नाव देखील झाले नाही. लॉर्ड विल्यम फावरे हा इंग्रज अधिकारी ३१ डिसेंबर १८४४ ला २५ सहाय्यक अधिकाऱ्यांना घेऊन बांदा भागातील स्वातंत्र्य सैनिकाना पकडून नेण्यासाठी येत होता. त्यावेळी गवस – देसाई यांनी कट्टा कॉर्नर येथील झाडीतून गोळीबार करत त्याला ठार केले. फावरे हा जागीच ठार झाला. वरिष्ठ अधिकाऱ्याला एका खेड्यातील तरुणाने अशा पद्धतीने ठार केल्याने सरकार खळवळून उठले व पॉलिटिकल एजंट जॉन्सन यांना मारेकरी जिवंत अथवा ठार करून आमच्या स्वाधीन करावे व बक्षीस न्यावे, असे फर्मान सोडले. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या मुखपत्रात ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. इंग्रज शासनाला काही केल्या हा क्रांतिकारक सापडत नव्हता. इंग्रजांनी त्यामुळे येथील निष्पाप जनतेस छळण्यास सुरुवात केली. हा छळ सहन न झाल्याने येथीलच श्री.हळदणकर-नाईक यांनी स्वतः पुढे येऊन आपण गोळ्या झाडल्याचे सांगितले. त्यांना डेगवे येथे काजऱ्याच्या झाडावर फासावर चढविण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा