You are currently viewing जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Rainy clouds for logo design illustrator, drops of rain symbol

जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नागरिकांनी दक्षता घ्यावी

सिंधुदुर्गनगरी

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. 5 जुलै रोजी  अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यासाठी  रेड अलर्ट (204 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस) हवामान  विभागामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. दिनांक 6 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) असून दिनांक 7, 8 व 9 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता (यलो अलर्ट) वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर सभाषण करू नये,

आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक- 02362 228847 किंवा टोल फ्री 1077, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष- 02363 256518. सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02363 272028. वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष-02366 262053. कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष-02362222525. मालवण तालुका नियंत्रण कक्ष-02365 252045. कणकवली तालुका नियंत्रण कक्ष-02367 232025. देवगड तालुका नियंत्रण कक्ष- 02364 262204 वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02367 237239.

हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावर यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास देवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी. किया जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 228847 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधुन बातमीची खातरजमा करावी. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे,घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सतर्क राहावे.आपण पूरप्रवण किंवा दरड प्रवण भागात राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत प्रशासनाकडुन मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणी या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पूल इ. ठिकाणी जावू नये. अतिवृष्टी होत असताना  कोणीही समुद्रात, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये. अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. पुराच्या पाण्यात समुद्रात नागरिकानी सेल्फी काढू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात चालू नये. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा