You are currently viewing व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना…

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना…

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना – रविकिरण तोरसकर

मालवण

गेल्या काही वर्षांमध्ये व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस सापडण्याचे प्रकार वाढले असून त्याच्या कथित तस्करीबद्दल मच्छिमार तसेच किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. व्हेल माशाच्या उलटी संदर्भात प्रशासन, मच्छिमार आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात समज गैरसमज असून आजही व्हेल माशाची उलटी बाबत सत्यता तपासणारी यंत्रणा नाही किंवा त्या यंत्रणेला मर्यादा आहेत. यामुळे कायद्याचा दुरुपयोग, तसेच तस्करी संदर्भात गोष्टी घडत असतात. त्यामुळे यासाठीच व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, फॉरेस्ट, संशोधन, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञ लोकांनी एक अभ्यास गट स्थापन केला असून या अभ्यास गटाने केलेला अभ्यास व संकलित केलेली माहिती ही प्रशासनाकडे सुपूर्द केली जाणार आहे, अशी माहिती या अभ्यास गटाचे समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

व्हेल हा मासा म्हणून ओळखला जात असला तरी शास्त्रीय भाषेत तो समुद्रातील सस्तन प्राणी आहे. सर्वसामान्य बोली भाषेमध्ये त्याला व्हेल मासा म्हणूनच ओळखले जाते. अंबर ग्रीस हे स्पर्म व्हेल माशापासून उत्पन्न होते अशी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. स्पर्म व्हेल हा वन्यजीव प्राणी कायदा संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत येत असल्यामुळे त्याची उलटी अथवा शरीरातून उत्सर्जित होणारा पदार्थ हा पण संरक्षित केला गेला आहे. तो संरक्षित असावा की नसावा याबाबत तज्ञांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये मत मतांतरे आहेत. यासाठी व्हेलच्या उलटीचा म्हणजेच अंबरग्रीसचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये मत्स्य महाविद्यालयचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर मंगेश शिरधनकर, वनखात्याचे निवृत्त विभागीय वनसंरक्षक अधिकारी सुभाष पुराणिक, सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज, देवगड महाविद्यालयाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार, वनशक्ती फाउंडेशनचे दयानंद स्टॅलिन, मालवण येथील पर्यटन व्यवसायिक आणि विधी अभ्यासक प्रसन्न मयेकर व इतर मान्यवर यांचा समावेश आहे. सदरच्या अभ्यासगटाबरोबर भारतातील राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मत्स्य संशोधक केंद्राचे मान्यवर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करीत आहेत.

सदरच्या अभ्यास गटाने केलेला अभ्यास व संकलित केलेली माहिती ही प्रशासनाकडे सुपूर्द केली जाणार असून व्हेल माशाच्या उलटी संदर्भात कायद्यातील तसेच धोरणातील बदल यासाठी त्याचा उपयोग होईल अभ्यास गटाला विश्वास आहे. अभ्यास करताना मच्छिमार पारंपारिक ज्ञानाचा पण वापर केला जाणार आहे. तसेच विविध महाविद्यालयातील संशोधक व विद्यार्थी किंवा अन्य कोणाकडे या संदर्भात कोणाकडे काही संशोधन, साहित्य अथवा पारंपारिक ज्ञान असेल त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन या अभ्यास गटातर्फे रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा