You are currently viewing निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी

निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी

*निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी*

दि.८ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत.

वैभववाडी

शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते. आणि पत्नीही मयत झाली आणि तिला अविवाहित मुलगी असेल तर तिला यापूर्वी वयाचे २४ वर्षापर्यंत पेन्शन मिळत होती. परंतु ८ फेब्रुवारी २०२४ मध्ये एक अधिसूचना काढून २४ वर्ष ही अट रद्द केली आहे. त्या मुलीला आता तिचे लग्न होईपर्यंत किंवा ती उपजिवेकेस सुरूवात करेपर्यंत तिला पेन्शन मिळणार आहे. आणि तिचे लग्न झालेच नाही किंवा तिला उपजिविकेसाठी दुसरे साधन मिळाले नाही तर तिला संपूर्ण आयुष्य भरासाठी पेन्शन मिळणार आहे, अशी अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र- भाग चार-अ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केली आहे.
या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन सुधारणा) नियम २०२४ असे संबोधले जाईल. या सुधारित अधिसूचनेचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने स्वागत केले असून याचा संबंधित लाभार्थीनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.
क्रमांक सेनिवे.-२०१८/प्र.क्र.४४ सेवा-४.भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ ला सुधारणा करणारे नियम यामध्ये केलेले आहेत. याबाबत बऱ्याच कर्मचाऱ्यांना याची फारशी माहिती असलेली दिसत नाही. या पूर्वी मयत झालेल्या पेन्शन धारकांच्या कोणाच्या मुली जर अविवाहित असतील किंवा घटस्फोटीत असतील तर त्यांना पेन्शन सुरू करता येईल याची माहिती दि.८ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेमध्ये सविस्तर देण्यात आली आहे. सदर माहिती गरजवंत मुली/मुलास मिळाल्यास त्यांचा आयुष्यभराचा फायदा होईल. महाराष्ट्र शासनाची सदर सुधारित अधिसूचना हवी असल्यास ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील (९८३४९८४४११), उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री. सीताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा