You are currently viewing वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वीज बीले भरणार नाही; वाफोली ग्रामस्थांचा महावितरणला इशारा

वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वीज बीले भरणार नाही; वाफोली ग्रामस्थांचा महावितरणला इशारा

वीजेच्या खेळखंडोबाने त्रस्त वाफोली ग्रामस्थांची बांदा महावितरणवर धडक

बांदा

वाफोली गावात वीजेच्या सातत्यपूर्ण खेळखंडोबाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी बांदा महावितरण कार्यालयावर धडक दिली. विविध प्रश्नांची सरबत्ती करुन सहाय्यक अभियंता कोहळे यांना घेराव घातला. महावितरण ओटवणे गावातील पुनरावृत्तीची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल करण्यात आला. थातूरमातूर आश्वासने नको. प्रत्यक्ष कार्यवाही न केल्यास संपूर्ण गाव वीज बीले भरणार नाही. त्यानंतर वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देण्याचा गर्भित इशारा यावेळी उपसरपंच विनेश गवस यांनी दिला.

वाफोली गावात सध्या वीजेचा खेळखंडोबा झाला आहे. वारंवार वीज गायब होत असल्याने ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत. कोल्ड्रिंक व्यवसायिकांसह विद्यार्थी व महिलांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत स्तरावरुन वारंवार पाठपुरावा करुनही संबंधित अधिकारी कानाडोळा करीत असल्याने संतप्त वाफोली ग्रामस्थ व महिलांनी अखेर बांदा वीज कार्यालयात धडक दिली.

वीज कर्मचारी फोन उचलत नाहीत. बेताल व अरेरावीची भाषा करीत असल्याची तक्रार महिलांनी केली. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वीजबीले भरणार नाहीत असा इशारा दिला. वीजवाहिन्यांवरील झुडपांची सफाई करण्यात आलेली नाही. बर्‍याच ठिकाणी वीजवाहिन्या तुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ओटवणे गावाप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात होणार्‍या दुर्घटनेला महावितरण जबाबदार राहील. त्याआधीच योग्य ती उपाययोजना करा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशारा सरपंच उमेश शिरोडकर यांनी दिला.

मंगळवार सकाळ पासूनच वीजवाहिन्यांवरील झुडपांची सफाई करण्याचे काम हाती घेण्यात येईल असे अभियंता कोहळे यांनी स्पष्ट केले. स्थानिक वायरमनलाही त्यांनी तंबी दिली.

यावेळी बांदा उपसरपंच जावेद खतीब, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, शिल्पा गवस,करिश्मा गवस, यशश्री गवस, सुलोचना गवस, रिचा आंगचेकर, प्रांजल गवस, रमेश मेस्त्री, महेश गवस, महादेव गवस, अनिल गवस, शैलेश गवस, सचिन गवस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 1 =