शिवराज मराठा विद्यालयाचे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात धवल यश!
प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रतिकृती व दिव्यांग प्रतिकृती प्रकारात विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; दोन प्रकारांत तृतीय क्रमांक पटकावला.
कुडाळ
बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयात दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव वाढविला.
या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात कुडाळ तालुक्यातील विविध शाळांनी विज्ञान विषयातील नाविन्यपूर्ण प्रतिकृती, संशोधनात्मक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सादरीकरण केले. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव या विद्यालयाने प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, निबंध तसेच विज्ञान प्रतिकृती अशा विविध प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रदर्शनामध्ये प्रश्नमंजुषा प्रकारात विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी दुर्वा निलेश धुरी व इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी नारायण सावंत यांनी तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून यश मिळविले. विज्ञान माध्यमिक प्रतिकृती प्रकारात कुमारी अस्मि सदानंद घाडी हिने तयार केलेल्या बियाणे व धान्य प्रतवारी यंत्र विज्ञान प्रतिकृतीला तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळाला तसेच तिची जिल्हास्तरावर निवड झाली. प्रतिकृती साठी साईश सावंत शिक्षक मंथन धुरी यांनी मोलाची मदत केली तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रतिकृती प्रकारात कुमारी प्रणवी विजय जांभळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री विद्यानंद पिळणकर, सौ. अर्चना चव्हाण, श्री मंथन धुरी यांचे संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी संस्था सचिव श्री प्रदीप प्रभू तेंडोलकर सर्व संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
