You are currently viewing दुर्गावाडी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ क्रिकेट स्पर्धेचे रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

दुर्गावाडी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ क्रिकेट स्पर्धेचे रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार; गावातील समस्या सोडवून विकासकामे मार्गी लावणार – रुपेश पावसकर यांची ग्वाही; विजेत्या संघाला ३० हजार, तर उपविजेत्याला २० हजारांचे पारितोषिक

कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाडी आयोजित ‘दुर्गावाडी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आयोजक मंडळाला शुभेच्छा देत मंडळाच्या सामाजिक व क्रीडा उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

 

यावेळी बोलताना रुपेश पावसकर म्हणाले, “मी नेहमीच या मंडळाच्या पाठीशी उभा राहणार आहे. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून विविध विकासकामे मार्गी लावण्यात येतील. निवडणुकीच्या काळात तुम्ही मला दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. तुम्ही कधीही मला हाक द्या, मी तुमच्या हाकेला हजर असेल.”

 

फ्रेंड्स ग्रुपच्या कार्याचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, “या मंडळाने छोटीशी सुरुवात केली होती. आज भव्यदिव्य अशी स्पर्धा भरवून जिल्हाभरात नावलौकिक मिळवला आहे.” मंडळाने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले.

 

आकर्षक पारितोषिकांची मेजवानी

 

या स्पर्धेतील विजेत्या संघासाठी रोख ३० हजार रुपये आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघासाठी रोख २० हजार रुपये आणि आकर्षक चषक असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

 

याशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठीही विविध आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट विकेटकीपर आणि बेस्ट क्षेत्ररक्षक या पुरस्कारांसाठी फ्रीज, मिक्सर, सायकल तसेच चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

 

या उद्घाटन सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते गोटू नाईक, फिरोज खतीब, हजीम मुजावर, नफिस शेख, बदर मुजावर, बशीर मुजावर, जोईल नाईक, तब्रेस खान, समीर मुजावर, करीम शाह, जहीर खान, आदीम शाह, फय्याज खान, बाबा शहा आदी मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच क्रिकेटच्या माध्यमातून एकोपा आणि सांघिक भावना वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा