मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या उपस्थितीत दिंडीचा शुभारंभ
सिंधुदुर्ग : भारतीय संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘संविधान दिंडी’चे आयोजन करण्यात आले. या दिंडीला जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून उत्साहात प्रारंभ झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. बासुर आणि श्री. सुकटे यांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेचे वितरण करण्यात आले. उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर डॉ. अपूर्वा बासुर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संविधान दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथून सुरू झालेली ही दिंडी डॉन बॉस्को हायस्कूल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओरोस येथे पोहोचली. भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तसेच भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
दिंडीमध्ये विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, नागरिक तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय संविधानाची भव्य प्रतिकृती दिंडीचे विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांनी संविधानिक हक्क आणि कर्तव्यांची माहिती देणारे फलक हातात घेतले होते. ‘भारतीय संविधानाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दिंडीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाली. यावेळी समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी आणि सहायक लेखाधिकारी उदय यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
