अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढून घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन
सिंधुदुर्ग : राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ३७ हजार ३८१ खातेदारांपैकी आतापर्यंत १ लाख ९० हजार ९२१ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकरी बांधव-भगिनींनी कोणताही विलंब न करता आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
यापुढे कृषी विभागाच्या विविध योजना, महाडीबीटीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, पीक नुकसान भरपाई अनुदान, पीक विमा योजना, नमो किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.
फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) ऑनलाइन नोंदणी करावी किंवा अॅग्रीस्टॅक पोर्टलवरून स्वतःही नोंदणी करता येईल.
शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांचा लाभ घेण्यात अडचण येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
