‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६’ मध्ये २६ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक आणि पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पशुधनावर आधारित विविध व्यवसायांना चालना मिळणार असून, प्रकल्प खर्चाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
या योजनेचा शुभारंभ दि. २६ नोव्हेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याने इच्छुक लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत संकरित गाय व म्हैस पालन, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, अंडी उबवणी केंद्र तसेच इन्क्युबेटर युनिट यांसारखे विविध प्रकल्प उभारता येणार आहेत. याशिवाय चारा विकास आणि स्मार्ट कॉलर, सेन्सर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना फार्मर आयडी आणि महा आयडीचा वापर करावा लागणार आहे. पात्र लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने दोन टप्प्यांत जमा करण्यात येणार आहे.
अर्जांची निवड शासनाच्या निर्धारित धोरणानुसार केली जाणार असून, निवड झालेल्या लाभार्थ्यांना संबंधित बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालन व पूरक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक, महिला बचत गट आणि बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घेऊन पशुधनावर आधारित व्यवसाय सुरू करावेत, आर्थिक उत्पन्न वाढवावे आणि स्वावलंबी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
