You are currently viewing फसवणूक झालेल्‍या युवक-युवतींना पैसे मागे देण्यास सुरवात

फसवणूक झालेल्‍या युवक-युवतींना पैसे मागे देण्यास सुरवात

दोन दिवसांत सर्वांची रक्‍कम परत केली जाणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि तालुका समन्वयक पदासाठी सिंधुदुर्गातील तब्‍बल ११२ युवक-युवतींकडून कोल्‍हापूरच्या त्रिकुटाने पैसे उकळले होते. या सर्वांना प्रत्‍येकी पाच हजार रूपये मागे देण्याची कार्यवाही आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनात सुरू झाली. पुढील दोन दिवसांत सर्व युवक-युवतींना त्‍यांचे पाच हजार रूपये परत दिले जाणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
सिंधुदुर्गातील कसाल येथील एका संस्थेकडे जिल्ह्यातील युवक – युवतींनी रक्‍कम जमा केली होती. तर या संस्थेने पाच हजार पैकी तीन हजाराची रक्‍कम कोल्‍हापूर येथील घुले नामक व्यक्‍तीच्या खात्‍यावर पाठवली होती. फसवणुकीच्या प्रकरणाचा नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी पर्दापाश केल्‍यानंतर घुले व्यक्‍तीने त्‍याच्या खात्‍यावर आलेले ११२ जणांचे प्रत्‍येकी तीन हजार रूपये कसाल येथील त्‍या संस्थेच्या नावे परत पाठवले. तर कसाल येथील संस्थेने जिल्ह्यातील युवक-युवतींना प्रत्‍येकी पाच हजार रूपये परत देण्यात सुरवात केली आहे. आज कणकवली आणि वैभववाडी तालुक्‍यातील युवक युवतींना त्‍यांचे पाच हजार रूपये मागे देण्यात आले. तर पुढील दोन दिवसांत उर्वरीत उमेदवारांची रक्‍कम मागे दिली जाणार आहे.


कणकवली नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष दालनात आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अनिल शिंगाडे आणि फसवणूक झालेले युवक-युवती यांची बैठक झाली. यात आज उपस्थित असलेल्‍या कणकवली आणि वैभववाडी तालुक्‍यातील युवक-युवतींना प्रत्‍येकी पाच हजार रूपयांची रक्‍कम देण्यात आली. तर पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवारांना ही रक्‍कम अनिल शिंगाडे यांच्या मार्फत कणकवली नगराध्यक्ष दालनात दिली जाणार असल्‍याची माहिती श्री.नलावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा