बालदिनानिमित्त जिल्ह्यात बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे आयोजन
बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी जनजागृती व विशेष तपासणी मोहीम राबविणार
सिंधुदुर्ग
दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी बालदिनाचे औचित्य साधून बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी कामगार विभागामार्फत राज्यभरात बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांसह विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविणे, दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापनांमध्ये बालकामगार कामावर ठेवू नयेत, याबाबत जनजागृतीपर स्टिकर्स लावणे, माहितीपत्रकांचे वाटप करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम आणि त्याविरोधातील कायदेशीर तरतुदींबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील वीटभट्ट्या, खडीक्रशर, हॉटेल्स, दुकाने, चहाच्या टपऱ्या, गॅरेज तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामगार विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सहभागातून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान बालकामगार आढळल्यास संबंधित बालकांची मुक्तता करून आस्थापनांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
याशिवाय हॉटेल असोसिएशन, दुकानदार व व्यापारी संघटना, औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तसेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकांमध्ये बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ तसेच महाराष्ट्र बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व विनियमन) (पहिली सुधारणा) नियम, २०२५ मधील तरतुदी, दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर परिणाम यांची माहिती देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत व्यापारी, उद्योजक, आस्थापनाचालक व नागरिकांकडून बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत सामुदायिक शपथ घेण्यात येणार आहे. बालपण हे शिक्षण, आरोग्य आणि आनंदासाठी असून कामासाठी नाही. त्यामुळे कोणत्याही आस्थापनेत बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ संबंधित कामगार कार्यालयास माहिती द्यावी आणि बालकामगारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी केले आहे.
