महिला विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणात आरोपी अगस्तीीन लोबो निर्दोष मुक्त
कुडाळ तालुक्यातील ओरोस-खिश्चनवाडी येथील प्रकरण; सरकारी पक्षाचा युक्तिवाद व तपासातील त्रुटी ग्राह्य धरत न्यायालयाचा निर्णय
सिंधुदुर्ग :
कुडाळ तालुक्यातील ओरोस-खिश्चनवाडी येथे महिलेचा विनयभंग, मारहाण व शिवीगाळ केल्याच्या आरोपातून संशयित अगस्तीीन लोबो यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ओरोस येथील मुख्य न्याय दंडाधिकारी अवघृत गजानन देशिंगकर यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी हा आदेश पारित केला.
या प्रकरणातील फिर्यादी महिला आपल्या घरी असताना तिचे पती व मुले गणपती सणानिमित्त मुंबई व पुण्याहून घरी आले होते. त्यावेळी अगस्तीीन लोबो हा त्यांच्या घराशेजारी राहत होता. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अंगणात झाडू मारत असताना अगस्तीीन लोबो याने रस्त्यावर उभे राहून त्यांना घाणेरडे शब्द बोलल्याचा आरोप होता. त्याला विरोध केला असता त्याने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादीने पती व मुलाला बोलावून घेतले असता संशयिताने मुलाच्या अंगावर धावून जाऊन त्याला खाली पाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
या घटनेबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून नऊ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, कथित घटनेच्या वेळी मारहाण व शिवीगाळ झाल्याचे सांगण्यासाठी कोणताही स्वतंत्र किंवा त्रयस्थ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला. तसेच मारहाणीसाठी वापरलेल्या हत्याराचा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला नसल्याचे आणि दोन्ही पक्षांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि तपासातील त्रुटी ग्राह्य धरून ओरोस येथील मुख्य न्याय दंडाधिकारी अवघृत गजानन देशिंगकर यांनी आरोपी अगस्तीीन लोबो यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भूषण कदम, अॅड. हरेश वराडकर आणि अॅड. आसिम मुजावर यांनी सहकार्य केले.
