You are currently viewing ८८ वर्षीय दिव्यांग वृद्धाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजू मसुरकर यांचे सहकार्य

८८ वर्षीय दिव्यांग वृद्धाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजू मसुरकर यांचे सहकार्य

८८ वर्षीय दिव्यांग वृद्धाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजू मसुरकर यांचे सहकार्य

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचा पुढाकार; दिव्यांगांना दरमहा २,५०० रुपये अर्थसहाय्य मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रियेबाबत जनजागृतीचे आवाहन

सावंतवाडी :

वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावातील फणसकोडवाडी येथील ८८ वर्षीय काशिनाथ पुंडलिक गावडे यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

गावडे हे दिव्यांग असून, दिव्यांगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी ते सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील तपासणीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. निखिल अवधूत यांच्याकडे पाठवले. यावेळी रुग्णालयात त्यांची राजू मसुरकर यांच्याशी भेट झाली. मुलगा मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने ते एकटेच आले होते.

यावेळी मसुरकर यांनी त्यांना दिव्यांगत्वाचा दाखला मिळवण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच ऑनलाइन ई-सेवा केंद्रामार्फत अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करून पुढील तपासणी व दाखल्यासाठी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आवश्यक अर्ज प्रक्रियेसाठी त्यांनी सहकार्य केले.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य :
मसुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध गरजू घटकांना आर्थिक मदत दिली जाते.
४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचा दाखला असलेल्या पात्र व्यक्तींना दरमहा २,५०० रुपये अर्थसहाय्य.
अंध, अपंग, मूकबधिर व कर्णबधिर व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू शकतो.

पात्रतेनुसार विधवा, अनाथ मुले, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला, तृतीयपंथी व्यक्ती आणि इतर निराधार घटकांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो.
वृद्धापकाळातील पात्र निराधार व्यक्तींनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
दिव्यांगत्वाचा दाखला (जिल्हा रुग्णालयातून).
उत्पन्नाचा दाखला.
रेशनकार्ड.
आधारकार्ड.
पासपोर्ट आकाराचा फोटो.

पात्र व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रामार्फत अर्ज करावा. योजनेचे निकष व अर्थसहाय्याची रक्कम संबंधित प्रवर्गानुसार लागू असते.
गरजू व्यक्तींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचे आवाहन :
शासनाच्या विविध योजनांची माहिती अनेक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि समाजसेवकांनी गावागावांत जाऊन अशा व्यक्तींना योजनांची माहिती द्यावी, अर्ज प्रक्रियेत मदत करावी आणि त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राजू मसुरकर यांनी केले.

केवळ धार्मिक विधी करण्यापेक्षा गरजू व्यक्तींना मदत करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हेच खरे समाजकार्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी संपर्क : राजू मसुरकर – ९४२२४३५७६० / ८९७५८५७७१६

प्रतिक्रिया व्यक्त करा