You are currently viewing सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा विनाखंड सुरू राहणार!

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा विनाखंड सुरू राहणार!

थकीत बिले तातडीने अदा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; औषधे व साहित्याचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किडनी विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. वैभववाडीसह जिल्हा महिला रुग्णालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय पेंडुरकट्टा आणि दोडामार्ग येथे महाडायलेसिस योजनेंतर्गत सुरू असलेली मोफत डायलेसिस सेवा यापुढेही विनाखंड सुरू राहणार आहे. या सेवेसाठी आवश्यक औषधे व इतर साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच सेवा पुरविणाऱ्या कंपनीची थकीत बिले तातडीने अदा करावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाडायलेसिस योजनेंतर्गत रुग्णांना मोफत डायलेसिस सेवा पुरविण्यात येते. मात्र, ही सेवा देणाऱ्या मे. एचएलएल लाईफ केअर लि. या कंपनीला सेवा पुरविल्यानंतरची बिले प्राप्त न झाल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा इशारा कंपनीने रुग्णालय प्रशासनासह रुग्णांना लेखी नोटिशीद्वारे दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील डायलेसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी महाडायलेसिस योजनेच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून सेवा विनाखंड सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.

जिल्हा समन्वयकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व संबंधित रुग्णालयांच्या डायलेसिस युनिटसाठी आवश्यक औषधे व इतर साहित्याचा साठा पुढील दोन आठवड्यांपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे या कालावधीत रुग्णांना डायलेसिस सेवा नियमितपणे मिळणार आहे.

दरम्यान, डायलेसिस सेवा पुरविणाऱ्या संबंधित कंपनीला शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेतून केवळ २५ टक्के रक्कम कॉर्पस फंडासाठी वजा करून उर्वरित पूर्ण रक्कम अदा करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाने रुग्णालय प्रमुखांना कार्यालयीन पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

कंपनीची थकीत देयके तातडीने अदा करण्यासाठी शासनस्तरावरही योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाडायलेसिस योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयांमधील मोफत डायलेसिस सेवा विनाखंड सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा