सावंतवाडीच्या डॉ. रवि गोळघाटे यांची ‘आयर्नमॅन 70.3 गोवा’ स्पर्धेत दमदार कामगिरी
८ तास ४ मिनिटांत ११३ किलोमीटरचे आव्हान पूर्ण; सिंधुदुर्गातील डॉक्टर फॅटरनिटीमधील पहिले मानकरी ठरण्याचा बहुमान
सावंतवाडी
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर कोणतेही आव्हान पेलता येते, हे सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रवि गोळघाटे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. गोवा येथे पार पडलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची ‘आयर्नमॅन 70.3 गोवा’ ही अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर फॅटरनिटीमधून हा बहुमान मिळवणारे ते पहिले मानकरी ठरले आहेत.
जागतिक स्तरावर कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे अशी एकूण ११३ किलोमीटरची आव्हाने पार करावी लागतात. डॉ. गोळघाटे यांनी हे अंतर ८ तास ४ मिनिटे ३ सेकंदांत पूर्ण केले. स्पर्धेची ८ तास ३० मिनिटांची निर्धारित वेळमर्यादा संपण्यापूर्वीच त्यांनी अंतिम रेषा गाठली.
या स्पर्धेत त्यांनी १.९ किलोमीटर पोहणे १ तास ५ मिनिटे ३ सेकंदांत, ९० किलोमीटर सायकलिंग ३ तास ३८ मिनिटे ३५ सेकंदांत, तर २१.१ किलोमीटर धावणे २ तास ५८ मिनिटे ४१ सेकंदांत पूर्ण केले. ४० ते ४४ वयोगटात १३१ स्पर्धकांमधून त्यांनी १०१ वे स्थान मिळविले. पुरुष गटात ९९३ स्पर्धकांमधून ७८४ वे, तर एकूण १,११४ स्पर्धकांमधून ८७१ वे स्थान पटकावले.
महाविद्यालयातील अध्यापनाची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक कामकाज सांभाळतानाच त्यांनी या स्पर्धेसाठी नियमित सराव केला. वेळेचे काटेकोर नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले.
यापूर्वीही त्यांनी गोवा रिव्हर मॅरेथॉन (४२ किमी), टाटा मुंबई मॅरेथॉन (४२ किमी), टाटा अल्ट्रा मॅरेथॉन लोणावळा (५० किमी), गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन (५६ किमी) तसेच बर्गमॅन ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलॉन, ओझर-पुणे अशा विविध स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.
प्राध्यापक म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मिळविलेली ही उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थी, तरुण आणि नोकरदार वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
