कणकवली गडनदीवर लोकसहभागातू बंधाऱ्याची उभारणी; पालकमंत्र्यांकडून पाहणी
*लोकसभागातून बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्याचे नाम . नितेश राणे यांनी केले कौतुक,जनतेचे मानले आभार
*जलसंधारणासाठी प्रशासन, जनता आणि सामाजिक संस्था एकवटल्या
*कणकवली तालुका व्यापारी संघ, रोटरी क्लब आणि स्नेहसिंधु कृषि पदवीधर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बांधला बंधारा
कणकवली :
शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून आदर्श बंधारा उभारला आहे. पाणी बचत आणि पाण्याचे योग्य नियोजन यासाठी कणकवलीकरांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले. कणकवली शहरातील गडनदीवरील कनकनगर येथील कच्च्या बंधाऱ्याच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, अशोक करंबेळकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, दीपक बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, विलास कोरगावकर, दयानंद उबाळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कणकवली तालुका व्यापारी संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि स्नेहसिंधु कृषि पदवीधर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या कच्च्या बंधाऱ्याची पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, कणकवलीच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाण्याची बचत आणि योग्य नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. याच उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह कनकनगर येथील बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली.
ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजून असे आदर्श बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पहिले पाऊल टाकल्यानंतर आता अशा प्रकारचे कच्चे बंधारे उभारून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात दुष्काळी परिस्थिती कमीत कमी निर्माण व्हावी, यासाठी प्रशासन, जनता, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम सुरू केले आहे. प्रत्येक विभागाच्या कामात कमी-जास्त बाबी असल्या तरी अधिकाऱ्यांची काम करण्याची तयारी असून, सर्व विभागांच्या समन्वयातून जलसंधारणाचे काम पुढे नेले जाईल, असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
