You are currently viewing महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार सामाजिक परिवर्तनासाठी आजही दिशादर्शक : डॉ. अनिल मडके

महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार सामाजिक परिवर्तनासाठी आजही दिशादर्शक : डॉ. अनिल मडके

सांगली / प्रदीप जोशी :

आज आपण घेत असलेल्या शिक्षणातून केवळ पदवीधर न होता एक संवेदनशील माणूस म्हणून घडले पाहिजे. महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या सामाजिक समते्साठी आणि शिक्षणासाठी संघर्ष केला, त्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार सामाजिक परिवर्तनासाठी आजही दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ व व्याख्याते डॉ. अनिल मडके यांनी केले.

‘क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना शैक्षणिक दृष्टिकोन आणि आधुनिक भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्वि जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी येथे आयोजित या कार्यक्रमास अप्पर कोषागार अधिकारी दीपाली यादव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले उपस्थित होते.

डॉ. अनिल मडके यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना शैक्षणिक दृष्टिकोन आणि आधुनिक भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना शिक्षण, स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, जातिभेद निर्मूलन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील फुले दाम्पत्याच्या योगदानावर प्रकाश टाकला.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली आणि भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे विशेष व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रंथालय क्षेत्रातील प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा