You are currently viewing समाजातील घुसमट साहित्यिकांनी निर्भयपणे लेखनात मांडावीः विनोद अष्टूळ

समाजातील घुसमट साहित्यिकांनी निर्भयपणे लेखनात मांडावीः विनोद अष्टूळ

पुणे :

प्रतिनिधी समाजातील घुसमट साहित्यात निर्भयपणे मांडून साहित्यिकांनी परीवर्तन करण्याची आज खरी गरज आहे असे मत साहित्यिक विनोद अष्टुळ यांनी व्यक्त केले.

पुणे येथील अश्वमेघ आय ए एस अकॅडमी व पब्लिकेशन हाऊस आयोजित खुले कवी संमेलन, भरत माने लिखित घुसमट कादंबरी ,अशोक मोहिते व विनायक पाटील यांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आणि साहित्यरत्न पुरस्कार २०२६ प्रदान सोहळ्याच्या आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. अष्टूळ म्हणाले की कवींच्या कविता समाज जागवणाऱ्या असाव्यात. आपण साहित्य लेखन करताना साहित्याशी समरस झाले पाहिजे .तरच मनातील घुसमटीची वेदना लेखन साहित्यात येवू शकते.

शब्द या अडीच अक्षरांमध्ये संपूर्ण जीवनाला ताकद मिळते. शब्द मनुष्याला बोलतात, कळतात, लागतात, पाडतात आणि घडवतातसुद्धा. म्हणून साहित्यिकांनी समाज हित साधणारे शब्दधन निर्माण करण्यासाठी विविध साहित्याचे वाचन करुन अवगत करावे. त्यासाठी इतरांचे साहित्य ऐकणे, वाचणे, समजून घेणे. त्यातील उणिवा शोधून त्यापेक्षा कसे दर्जेदार लेखन करता येईल याकडे विचारपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेचा दर्जा टिकवण्यासाठी मदत होईल.

घुसमट ही कादंबरी मनातील अंधार तर दीपोत्सव हा कवितासंग्रह मनामनातील प्रकाश दाखवणारा आहे. म्हणून साहित्यिकांनी समाज जागृतीसाठी साहित्यात सत्यविचार निर्भीडपणे लेखनात मांडून समाज परीवर्तन करण्याची आवश्यकता आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी रामजीत गुप्ता, श्रीमती प्रियंका आबनावे, प्रमुख अतिथी रतिलाल चौधरी, अश्वमेध संस्थेच्या प्रकाशिका प्रा.अश्विनी काळे, मनोज लडकत निवेदक संदीप रासकर विचारपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते घुसमट आणि काव्य दीपोत्सव या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना समाज रत्न आणि साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये विनोद अष्टुळ यांना साहित्यिक क्षेत्रात चौदा वर्षामध्ये साहित्यसम्राट पुणे संस्थेतर्फे विविध ठिकाणी म्हणजे पदरस्त्यापासून ते विद्यापीठापर्यंत नाविन्यपूर्ण उपक्रमांतून मराठी भाषा संवर्धनासाठी नाबाद २३३ कवी संमेलने घेऊन उल्लेखनीय कार्याबद्दल साहित्यरत्न पुरस्कार – २०२६ देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांच्या अध्यक्षतेखाली विविध जिल्ह्यातून आलेल्या कवी कवयित्रींचे राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात पार पडते. त्यामध्ये कवी अशोक मोहिते, विनायक पाटील, विलास बाबर, लक्ष्मण शिंदे, सागर सोनवणे, आशा शिंदे, साईनाथ, डी एन मोरे, वैशाली शेलार, सचिन शिलावट, राजेंद्र पोकळे, अशोक शिंदे, विष्णुदास पुरी, सचिन चौधरी, सुरज पवार, शांताराम देशमुख, दत्ता पोटलेवाड, पांडुरंग हापसेवाड, आशा शिंदे, स्नेहा भोसले, नंदकिशोर गावडे, अरुण घोडके, सुनिता घोडके अनेकांनी आपल्या काव्यरचना सादर करून सभागृहाची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशिका अश्विनी काळे यांनी, कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर मनोज लडकत यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा