*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*दिवाळीचा खरा प्रकाश : आतषबाजीत नव्हे, तर माणुसकीच्या दीपोत्सवात!*
दिवाळी! नावातच आनंद, उत्साह आणि चैतन्य भरलेला वर्षातील सर्वांत मोठा आणि भारतीयांचा अतिशय लाडका सण! अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि निराशेवर आशेचा विजय साजरा करणारा हा दीपोत्सव!
दिवाळीचे पाचही दिवस आपल्याला वेगवेगळे संदेश देतात. धनत्रयोदशी हा आरोग्य, धन आणि समृद्धीचा सन्मान करण्याचा दिवस. नरक चतुर्दशी वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाच्या विजयाची आठवण करून देते. लक्ष्मीपूजनातून सुख, समृद्धी आणि मांगल्याचे स्वागत केले जाते. बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा हा प्रेम, विश्वास आणि नात्यांतील जिव्हाळा जपण्याचा दिवस, तर भाऊबीज बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा गोडवा वाढवणारा सण. अशा विविध परंपरा आणि भावनांनी नटलेली दिवाळी आपल्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवते.
दिवाळीची चाहूल लागली की घराघरांत लगबग सुरू होते. घराची स्वच्छता, सजावट, आकर्षक आकाशकंदील, दारासमोरची सुंदर रांगोळी, पणत्यांची रोषणाई आणि घराघरांतून दरवळणारा फराळाचा सुगंध… चकली, करंजी, लाडू, चिवडा, शंकरपाळे अशा चविष्ट पदार्थांची रेलचेल! नातेवाईकांच्या भेटीगाठी, मित्रमंडळींच्या शुभेच्छा, लहान मुलांचा आणि माहेरवाशिणीचा उत्साह, मोठ्यांचे आशीर्वाद… सगळे वातावरणच आनंदाने भारलेले असते.
खरोखरच, दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची आरास नव्हे, तर नात्यांची उजळण आणि आनंदाची उधळण!
या आनंदोत्सवाला एक दुसरी बाजूही आहे. ती म्हणजे फटाक्यांची आतषबाजी!
दिवाळी म्हणजे फटाके आणि फटाके म्हणजेच दिवाळी, असे समीकरणच जणू रूढ झाले आहे. फटाक्यांच्या रोषणाईत आणि आवाजात आपण इतके रमतो की त्याचे दुष्परिणाम मात्र विसरून जातो.क्षणिक आनंदासाठी फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण वाढते. धूर आणि सूक्ष्म कण वातावरणात मिसळतात. मोठ्या आवाजामुळे लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध नागरिक आणि नवजात बालकांना त्रास होतो. आपल्या आनंदाच्या या गोंगाटात किती जणांना त्रास होतो याचाही विचार केला पाहिजे, मुक्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचेही जगणे या आवाजामुळे अस्वस्थ होते.
आणखी एक महत्वाची, विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे फटाक्यांवर खर्च होणारा पैसा! हजारो रुपये काही क्षणांच्या आतषबाजीत खर्च होतात आणि शेवटी उरतो तो धूर, कचरा आणि प्रदूषण! हाच पैसा एखाद्या गरजूच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी वापरता आला तर?
मग प्रश्न पडतो, दिवाळीचा आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके उडविणे हाच एकमात्र पर्याय आहे का?
नाही! दिवाळीचा आनंद फटाक्यांपुरता मर्यादित नाही. उलट, तो अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण करण्याचे अनेक मार्ग आहेत.
फटाक्यांऐवजी आपले घर व परिसर स्वच्छ करून घरात, अंगणात आणि परिसरात पणत्यांची रोषणाई करावी. सुंदर रांगोळ्या काढता येतील, कुटुंबीयांसोबत फराळाचा आनंद घ्या आणि. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी प्रेमाचे बंध दृढ करूया.
फटाक्यांवर खर्च होणाऱ्या पैशांतून गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य देता येईल. अनाथ मुलांना फराळ वाटल्यास.व वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलले त्यांची विचारपूस केली तर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद क्षणिक लखलखित. प्रकाश देणाऱ्या फटाक्यांपेक्षा निश्चितच अधिक आनंददायी असेल,एखाद्या गरजू कुटुंबाला मदत करता येईल,शेवटी, दिवाळी ही केवळ स्वतःच्या घरात प्रकाश निर्माण करण्याची नव्हे, तर दुसऱ्यांच्या आयुष्यातही आनंदाचे दीप उजळवण्याची संधी आहे.
इथे एका सुंदर हिंदी गीताच्या ओळी आठवतात…
‘ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो…’
किती सुंदर संदेश आहे या ओळींमध्ये! एका दिव्याने दुसरा दिवा पेटवावा, त्याप्रमाणे आपणही आपल्या आनंदातून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा प्रकाश सर्वदूर पसरवावा.
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपला आनंद दुसऱ्याच्या त्रासाचे कारण बनू नये. फटाक्यांच्या मोठ्या आवाजापेक्षा हास्याचे आवाज मोठे व्हावेत. धुराच्या लोटांपेक्षा माणुसकीचा सुगंध दरवळावा. पैशांची राख करण्यापेक्षा त्या पैशांतून कुणाच्या तरी आयुष्यात आनंद फुलावा.
दिवाळी साजरी करायचीच, पण ती पर्यावरणपूरक, संवेदनशील आणि सर्वसमावेशक पद्धतीने!
कारण दिवाळीचा खरा प्रकाश आकाशातल्या आतषबाजीत नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा दीप प्रज्वलित करण्यात आहे.
चला तर मग, यंदा संकल्प करूया…
फटाक्यांचा गोंगाट कमी करून आनंदाची गोडी वाढवू. प्रदूषण टाळून माणुसकी जपण्यातच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करता येईल,. घराघरांत पणत्या लावण्याबरोबरच मनामनांत संवेदनशीलतेचा दिवा प्रज्वलित करून.
खऱ्या अर्थाने प्रकाशाची दिवाळी साजरी करता येईल!
ही दिवाळीची खरी ओळख असेल आणि नव्या पिढीसाठी सुंदर शिकवण!
🖊️प्रतिभा पिटके
अमरावती
