You are currently viewing प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा; विटा नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन 

प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा; विटा नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन 

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

विटा शहरातील नागरिकांनी यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने साजरी करावी. तसेच ध्वनी व वायुप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळून हरित फटाक्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन विटा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७ आणि माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून विटा शहरात पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिक आणि फटाके विक्रेत्यांना जाहीर आवाहन केले आहे.

भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार १२५ डेसिबल (AI) पेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री व वापर करण्यास मनाई आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ६ नोव्हेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार आयात केलेल्या फटाक्यांची विक्री व वापर करण्यासही प्रतिबंध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथियम, आर्सेनिक, लीड आणि मर्क्युरी यांसारखे घातक घटक असलेल्या फटाक्यांचा वापर करू नये. या रासायनिक घटकांमुळे विषारी वायू निर्माण होऊन पर्यावरण, प्राणी व वनस्पतींना हानी पोहोचते.

फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक अधिनियम व त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करावे. प्रतिबंधित फटाक्यांची विक्री करू नये, असेही नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी प्रदूषणकारी फटाक्यांचा वापर टाळून तुलनेने कमी हानिकारक रसायने असलेल्या आणि कमी धूर व राख उत्सर्जित करणाऱ्या हरित फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळी सण साजरा करताना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. सण-समारंभांमध्ये पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंना प्राधान्य द्यावे. फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त आणि पर्यावरणपूरक ग्रीन फेस्टिव्हल साजरा करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

विटा शहराला स्वच्छतेच्या स्पर्धेत पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त विटा शहराच्या निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य समिती सभापती भालचंद्र कांबळे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा