You are currently viewing विटा शहरातील एकल महिलांनी नगरपरिषदेकडे नोंदणी करावी

विटा शहरातील एकल महिलांनी नगरपरिषदेकडे नोंदणी करावी

महिला व बालकल्याण सभापती सौ. अपर्णाताई पाटील यांचे आवाहन

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या दि. २२ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने एकल महिला मसुदा समिती गठीत केली असून, या धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील एकल महिलांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर, नगराध्यक्षा सौ. काजलकाकी म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, महिला व बालकल्याण सभापती सौ. अपर्णाताई पाटील, उपसभापती सौ. शिलाताई लिपारे व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर विटा नगरपरिषदेकडून विटा शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील विधवा, परित्यक्ता, अविवाहित तसेच घटस्फोटीत महिलांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपली नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती सौ. अपर्णाताई पाटील यांनी केले आहे.

विटा शहरातील पात्र महिलांनी विटा नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधून सर्वेक्षणासाठी अर्ज भरून नोंदणी करावी. अर्ज नोंदणीसाठी संबंधित महिला विटा शहरातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीसाठी येताना आधारकार्डची छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.

या सर्वेक्षणातून एकल महिलांची अधिकृत माहिती संकलित होण्यास मदत होणार असून, भविष्यात त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक शासकीय धोरणे व योजनांची आखणी करण्यास या माहितीचा उपयोग होणार आहे.

त्यामुळे विटा शहरातील एकही पात्र महिला या सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घेऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सभापती सौ. अपर्णाताई पाटील यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी :

विभागप्रमुख नेहा खडके, विटा नगरपरिषद, विटा यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा