You are currently viewing कणकवली पंचायत समिती आणि स्नेहसिंधूमार्फत सुरु केलेल्या गावठी आठवडा बाजाराचा निलेश राणेंच्या हस्ते शुभारंभ…

कणकवली पंचायत समिती आणि स्नेहसिंधूमार्फत सुरु केलेल्या गावठी आठवडा बाजाराचा निलेश राणेंच्या हस्ते शुभारंभ…

कणकवली

शेतकरी टिकला तर महाराष्ट्राची भरभराट होईल. राज्यात विकासाची गंगा येईल म्हणून शेतकऱ्यांना तारले पाहिजे. त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील आणि कोकणातील शेतकरी नैसर्गिक संकटांना सामोरे जात जे कष्ट भोगत आहे त्या शेतकऱ्यांना या ठाकरे सरकाने उद्धवस्त केले. शेतकरी जगला पाहिले, टिकला पाहिजे यासाठी ठाकरे सरकारने काही केले नाही. मात्र, कणकवली पंचायत समितीने करून दाखवले. शेतकऱ्यांच्या हितासाठी असे गावठी आठवडा बाजारासारखे उपक्रम सातत्याने चालू ठेवा, असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केले.

कणकवली पंचायत समिती आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित गावठी भाजीपाला, धान्य, वस्तू, खाद्यपदार्थ यांचा गावठी आठवडा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला. भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते फिट कापून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी त्याचे स्वागत केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, अभिनेता अनिल गवस, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, सोनू सावंत भाजपा युवकचे संदीप मेस्त्री, शामसुंदर दळवी, सूर्यकांत वारंग, स्नेहसिंधूचे हेमंत सावंत, पंकज दळी, व्ही. के. सावंत, संदीप राणे आदी उपस्थित होते.

निलेश राणे म्हणाले की, शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी बाजारपेठेत उभी करून दिली त्याचे मला समाधान वाटते. कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे आणि त्यांचे सहकारी चांगले उपक्रम राबवित आहेत. हा गावठी आठवडा बाजार असाच कायम सुरू ठेवा त्याचे सातत्य कायम ठेवा. अजून शेतकरी जोडा असे आवाहन निलेश राणे यांनी केले.

शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात ठाकरे सरकारने उद्धवस्त केले. नुकसानभरपाई नाहीच तर साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही. आपले आमदार नितेश राणे राज्य सरकारच्या विरुद्ध कायम भांडतात. मात्र, सरकारला जाग येत नाही, अशी टीका केली. तसेच या पुढेही कणकवलीत कार्यक्रमासाठी बोलवत रहा, असेही त्यांनी सांगितले.

अभिनेते अनिल गवस म्हणाले की, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजारपेठ उभी केली, तशी ही बाजारपेठ आहे. एकमेकांसाठी हात दिला पाहिजे. भावासाठी भाऊ उभा राहतो हे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे उदाहरण आपल्या समोर आहे. असेच आपणही एका दुसऱ्यांसाठी काम केले पाहिजे. आठवड्याला या आणि खरेदी करा. ग्राहक म्हणून तुमची या शेतकऱ्यांना गरज आहे, असे अभिनेते अनिल गवस म्हणाले. यावेळी आभार उपसभापती प्रकाश पारकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 1 =