बांधकाम सभापती श्रीकांत साळुंखे
विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
अपुऱ्या माहितीवर जनतेत संभ्रम निर्माण करून विटा शहराच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा बांधकाम सभापती श्रीकांत साळुंखे यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेली माहिती अशी : विटा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या मायणी रोड, तासगाव रोड इत्यादी विकासकामाबाबत काही प्रश्न उपस्थित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कोणत्याही विकासकामाची वस्तुस्थिती समजून न घेता, काम पूर्ण होण्यापूर्वीच त्यावर निष्कर्ष काढणे आणि त्याबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करणे ही भूमिका अत्यंत चुकीची आणि विकासाला मारक आहे.
सर्वप्रथम, सदरचा राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र शासनाच्या नियमानुसार आणि निर्धारित निकषांनुसार विकसित केला जात आहे. या कामाची प्रक्रिया, तांत्रिक बाबी आणि अटी या संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या कामाबाबत कोणतीही शंका उपस्थित करण्यापूर्वी संबंधित वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
जुन्या डिव्हायडर, झाडे आणि पथदिव्यांचे काय होणार?
महामार्गाच्या कामामुळे रस्त्यावरील जुने डिव्हायडर, झाडे आणि पथदिवे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, महामार्गाच्या कामाच्या निविदेतील तरतुदींनुसार आवश्यक ते अधिग्रहण करून नवीन महामार्गावर नियोजनानुसार डिव्हायडर, पथदिवे तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जुन्या सुविधा काढल्या म्हणजे त्या कायमस्वरूपी संपुष्टात आल्या, असा गैरसमज पसरवणे चुकीचे आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर व्यापारी, स्थानिक नागरिकांच्या विचारविनिमयाने डिव्हायडर मधील रस्ता आवश्यक तिथे खुला केला जाईल.
महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच प्रश्न उपस्थित करण्याची घाई कशासाठी?
कोणतेही मोठे पायाभूत सुविधा विकासकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असते. सध्या महामार्गाचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्वरूप, सुविधा आणि प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट होतील. त्यामुळे काम सुरू असतानाच अंतिम निष्कर्ष काढणे, त्रुटी असल्याचे गृहीत धरणे आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. टीका करण्यापेक्षा वस्तुस्थितीची पडताळणी करणे अधिक महत्त्वाचे आहे.
विटा शहराच्या विकासासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा!
हा महामार्ग विटा शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सुधारित दळणवळण व्यवस्था, वाहतुकीची सुलभता, औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी आणि स्थानिक व्यावसायिकांना मिळणाऱ्या नव्या संधी या दृष्टीने या महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महामार्गामुळे विटा शहराच्या आर्थिक विकासाला गती मिळणार असून स्थानिक उद्योग, व्यापारी आणि नागरिकांसाठी विकासाची नवी दालने खुली होणार आहेत.
विकासकाम करताना काही जुन्या सुविधा बदलल्या जातात, काही गोष्टींचे पुनर्नियोजन केले जाते. मात्र, त्यातून अधिक चांगल्या आणि आधुनिक सुविधा निर्माण होणार असतील, तर त्या प्रक्रियेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.
विकासकामातील त्रुटी दाखवून देण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. मात्र, अर्धवट माहितीच्या आधारे विकासकामाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि नागरिकांची दिशाभूल करणे हा कोणताही विधायक दृष्टिकोन नाही.
विटा शहराला आधुनिक पायाभूत सुविधा हव्या असतील, तर विकासकामांना सहकार्य करणेही तितकेच आवश्यक आहे. विकासाला विरोध नको, तर विकासकाम अधिक दर्जेदार आणि लोकहिताचे व्हावे यासाठी विधायक सूचना हव्यात. विटा शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्या कोणत्याही नकारात्मक भूमिकेला वस्तुस्थितीच्या आधारे उत्तर दिले जाईल.
विटा शहराचा विकास, नागरिकांचे हित आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे हीच आमची ठाम भूमिका आहे.
