फोंडाघाट बायपासवर मोठा अनर्थ टळला; ओव्हरलोड ट्रकप्रकरणी PWD वर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष, १ मे रोजी उपोषणाचा इशारा – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी आक्रमक
फोंडाघाट
फोंडाघाट बायपास मार्गावर आज मोठा अपघात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे ५० टन माल वाहून नेणारा एक मोठा ट्रक ओव्हरलोडमुळे बिघाड होऊन अचानक मागे सरकला. सुदैवाने त्यावेळी ट्रकच्या मागे कोणतीही चारचाकी नव्हती, अन्यथा मोठा जीवितहानीचा अपघात घडला असता.
सदर ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने जड वाहतूक वैभववाडी मार्गे वळविण्याचे स्पष्ट निर्देश देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र, स्थानिकांच्या आरोपानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि स्थानिक कंत्राटदार यांच्या संगनमताने हे नियम धाब्यावर बसवून जड वाहतूक सुरूच ठेवली जात आहे. यामागे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केला आहे.
घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विशेष म्हणजे, कणकवली PWD कार्यालयाशी संपर्क साधूनही तब्बल तीन तास कोणतीही मदत मिळाली नाही. दरम्यान, लग्न समारंभासाठी जाणाऱ्या वाहनांसह पर्यटकांच्या गाड्या अडकून पडल्या होत्या.
या परिस्थितीत गटनेते संजय आग्रे यांच्या JCBच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला. संबंधित JCBचे भाडेही अडकलेल्या ट्रक चालकाकडून घेऊन देण्याची व्यवस्था अजित नाडकर्णी यांनी केली.
या सर्व प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, योग्य कारवाई न झाल्यास १ मे रोजी उपोषणाचा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणाकडे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, PWD विभागाच्या निष्क्रिय कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, भविष्यात मोठा अपघात टाळायचा असेल तर तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
