*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावलीच्या पदराखाली*
गावाच्या पायथ्याशी उभा डोंगर
कधीकाळी राजबिंडा वाटायचा
दुरूनसुद्धा रुबाब त्याचा
भारी दिसायचा
हिरवी हिरवी झाडे त्याच्या
अंगाखांद्यावर खेळायची
अल्लड, हुल्लड झुळूक वाऱ्याची
धावतच यायची
वळणावरच्या वाटेवर
घनदाट जंगल असायचे
दूरदेशी पाखरे वस्ती करून राहायची
अवतीभोवती गावात
झाडांची गर्दी दिसायची
सावलीच्या पदराखाली
गारव्याची मिठी असायची
झाडांमुळे गाव कसे
शोभून दिसत होते
येताजाता माणसांची
भेट घेत होते
नवी नवरी वसुंधरा ही
नटूनथटून यायची
वृक्षवल्ली सोयऱ्यांसंगे
प्रदक्षिणा घालायची
कधीकाळी संध्याकाळी
अंगणात बसून मस्तपैकी
सळसळत्या पानांची
मस्ती बघायचो
झाडांशी गप्पा करताना
पक्ष्यांची गाऱ्हाणी ऐकायचो
कुठून तरी फुलांचा गंध
दरवळून यायचा
बगळ्यांचा थवा आभाळात
गिरक्या घ्यायचा
लाजरीबुजरी नदी कशी
खळखळ वाहत राहायची
कावड खांद्यावर घेऊन ती
घराघरांतले रांजण भरायची
गुरेढोरेही तिथे तिच्याजवळ
घडीभर विसावा घेत होती
कासावीस झालेल्या जीवांची
ती तहान भागवत होती
पाऊसही न सांगता
दीर्घ मुक्कामाला यायचा
नदी, नाले, विहिरी
गच्च भरून द्यायचा
झरेझिरपेही ओसंडून वाहत होते
चिमणी-पाखरे चोची मारून
भुर्रकन उडून जात होती
थेंबाथेंबांच्या पाण्याने
माती गर्भार व्हायची
पावसाच्या सरी तिच्या
बाळंतपणाला यायच्या
शेतमळे कसे धनधान्याने
भरून जात होते
सुगीचे दिवस डोळे भरून
पाहायला मिळत होते
पण… आता…
रोज झाडांची कत्तल होते
डोक्यावरची सावली जाते
तप्त उन्हात जीव कासावीस होतो
घडीभर विसाव्यासाठी
माणूस झाड शोधत फिरतो
अरे! झाडे नाहीत म्हणूनच
पाऊसही पडत नाही
हंडाभर पाण्याने कुणाचीही
तहान भागत नाही
तेव्हा, नका तोडू झाडे
झाडे लावा, झाडे जगवा
सारेच पुन्हा हिरवेगार होईल
माणसा-माणसांच्या आयुष्यात
पुन्हा नंदनवन येईल
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
