ओसरगावच्या दिव्या राणेचा कॅरममध्ये दबदबा कायम!
तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड, राणे कुटुंबाच्या कॅरम परंपरेचा तिसऱ्या पिढीत वारसा कायम
ओसरगाव :
कॅरम स्पर्धेत ओसरगावच्या कु. दिव्या दिलीप राणे हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत तिने विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. डॉन बॉस्को स्कूल, ओरोस येथे सातवीमध्ये शिकणाऱ्या दिव्याच्या या यशामुळे ओसरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिव्याला कॅरमचे प्रशिक्षण देण्याबरोबरच तिचे वडील श्री. दिलीप राणे गेली सात ते आठ वर्षे तिच्याकडून सातत्याने सराव करून घेत आहेत. शालेय शिक्षण सांभाळून दिव्या दररोज घरी कॅरमचा सराव करते. वडिलांचे मार्गदर्शन, अथक मेहनत, जिद्द आणि सरावाच्या जोरावर तिने आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विविध कॅरम स्पर्धांमध्ये अनेक चषक व पारितोषिके मिळविली आहेत.
विशेष म्हणजे, राणे कुटुंबाची कॅरम खेळाची परंपरा आता तिसऱ्या पिढीत पोहोचली आहे. दिव्याचे आजोबा उत्कृष्ट कॅरमपटू होते. तिचे काका आणि वडीलही उत्कृष्ट कॅरमपटू म्हणून ओळखले जातात. या क्रीडा प्रवासात त्यांचे मामा कै. अनंत साटम यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रेरणेतूनच कुटुंबात कॅरम खेळाची आवड आणि परंपरा जोपासली गेली आहे.
दिव्याने मिळविलेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ओसरगाव गावासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब ठरली आहे. आता विभागीय स्पर्धेतही दिव्या आपल्या खेळाची चमक दाखवून यशाची नवी उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
