अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि सावंतवाडी नगरपरिषदेचा संयुक्त उपक्रम; ५ नोव्हेंबरला मोफत आरोग्य शिबिराने होणार शुभारंभ
सावंतवाडी : आयुर्वेदिक उपचारांची सुविधा आता सावंतवाडीकरांच्या अधिक जवळ येणार आहे. शहरातील नागरिकांना नामवंत तज्ज्ञांकडून दर्जेदार आयुर्वेदिक उपचार मिळावेत, या उद्देशाने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘आयुष’ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येत आहे. गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराने या सेवेचा शुभारंभ होणार असून, यामुळे सावंतवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला आणि आरोग्य शिबिराला आमदार दीपक केसरकर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे संचालक प्रो. वैद्य प्रदीपकुमार प्रजापती, अधिष्ठाता प्रो. डॉ. सुजाता कदम, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखमराजे भोसले यांच्यासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक नागरिकांना नामवंत तज्ज्ञांकडून दर्जेदार आयुर्वेदिक उपचार मिळावेत, या उद्देशाने सुरू करण्यात येणारी ही आयुष ओपीडी पुढील आठवड्यापासून नियमितपणे कार्यरत होणार आहे. दर आठवड्याला मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ओपीडी सुरू राहणार आहे.
बॅ. नाथ पै सभागृहासमोरील भाजी मंडई इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. सावंतवाडी व परिसरातील नागरिकांना उद्याच्या मोफत आरोग्य शिबिराचा तसेच नियमित सुरू होणाऱ्या या आयुष ओपीडी सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
