मुंबई:
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचा आणि माणुसकीचे नाते जपण्याचा सण आहे. याच सामाजिक भावनेतून अश्रू फाउंडेशनच्या वतीने गोरेगाव, आरे कॉलनी येथील फुटक्या तळ्याचा आदिवासी पाडा येथे ‘दिवाळी आनंदोत्सव’ हा सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी या आनंदोत्सवाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री. सुनील पाटील संस्थापक, अश्रू फाउंडेशन, सौ. सुनीता सुनील पाटील – अध्यक्षा, अश्रू फाउंडेशन, श्री. गोकुळ पंडित पाटील, श्री. विठ्ठल चोथे- निवृत्त पोलीस अधिकारी, सौ. तृप्ती मॅडम – शिक्षिका आदी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील महिला, पुरुष आणि लहान मुलांना दिवाळीचे दिवे, मिठाई, फराळ आणि चॉकलेट्स भेट देण्यात आले. या छोट्याशा प्रेमाच्या भेटीने लहान मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले निरागस हास्य आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच या उपक्रमाचा खरा पुरस्कार ठरला. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि माणुसकीचे नाते अधिक दृढ करणे, हाच अश्रू फाउंडेशनचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कारण, दिवाळीचा खरा आनंद स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे! या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे, हितचिंतकांचे आणि सहकाऱ्यांचे अश्रू फाउंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
