*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वितभर पोटासाठी*
वितभर पोटासाठी
घरदार सोडून गावाच्या
वेशीबाहेर पडायचं
जिथे पोटाला भाकर मिळेल
ते गाव आपल समजायचं
तोडका मोडक संसार
बैलगाडीत भरला की
कष्टाचा रस्ता धरायचा
ज्या गावाला मुक्काम
त्या गावच्या मातीचा गंध
कपाळी लावायचा
खळ्या मळ्यात कुठेतरी
मोकळ्या जागेत
झोपडी बांधायची
एकमेकांच्या संगतीने
संसाराची गाडी ओढायची
पोटात बाळ असल्यावर ही
हातचं काम सुटत नाही
काम केल्याशिवाय तव्यावर
भाकर शिजत नाही
कधी कधी शेतमळ्यात
उसाच्या पाचटातही
बाळ जन्माला येत
पोट धरायला तेव्हा
तिच्या जवळ कोणी नसतं
अशाही अवस्थेत ती
एक दिवसाची बाळांतीन
दुसऱ्या दिवशी कोयता घेऊन
कामाला लागते
नवऱ्याच्या संगतीन सरसर
भारा कापते
पालापाचोळ्यात निजलेल पोरगं
बोंबलायला लगल की तिने
पाठीला बांधून घ्यायचं
अन् मोकळ्या झालेल शेतशिवार डोळेभरून पहायचं
मग काम संपलं की
बैलांच्या गळ्यातला कासार ओढून
मुक्काम हलवायचा आणि
नव्या गावच्या मातीत
घाम कष्टाचा जीरवायचा
कष्ट करणाऱ्याला कुठलं गाव नी्
कसल घर असतं
कुठे जन्म कुठे मरण माहित नसतं
पोटाची खळगी भरायला
भूक कुठही पळवत असते
कुठल्याच गावच्या पंचायतीत
जन्म मृत्यूची नोंद नसते
म्हणून ऊन वारा थंडी पावसाच
पांघरूण अंगावर ओढून
उघड्यावर संसार करायचा
एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद
एकमेकांनी बघायचा
©® संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८
