You are currently viewing कृतार्थता

कृतार्थता

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी वि ग सातपुते लिखित काव्याचे सौ.गौरी चिंतामणी काळे यांनी केलेले रसग्रहण*

 

*कृतार्थता*

**********

जगता जगता जगत राहिलो

तरीही उलगडले नाही जगणे

मनूजन्मच लाभला देवकृपेने

तरीही कर्म भोगणे हेच जिणे ….

 

आसक्तीचे हे भास मृगजळी

भौतिक सुखाचे स्वप्न चांदणे

भावशब्दांचे अर्थच वेगवेगळे

दुरापास्त झाले सत्य कळणे ….

 

मनभावनांचेच स्पर्श अचेतन

नाते ऋणानुबंधी जणू खेळणे

पहा….

हिरवळलेल्या वेली कोवळ्या

गंध सुगंधाचे अलवारी गंधणे….

 

चराचराचा हा दृष्टांत मनोहर

उमजतानां सुंदर होते जगणे

मना फुलांना रिझवीत जाता

जगणेच हे कृतार्थी दरवळते….

***********************

*५ जून २०२५ (५३)*

*वि.ग.सातपुते.(भावकवी)*

*📞(९७६६५४४९०८)*

 

*कृतार्थता* ही मनुष्य जन्माचे शाश्वत सत्य सांगणारी आदरणीय वि.ग. सातपुते सरांची एक सुंदर भावकविता आहे.

मनुष्य जन्म दैवी कृपेने अथक प्रयासानंतर लाभतो असे सांगितले जाते.मानव जन्म घेतल्यावर आवश्यक कर्म करणे व कर्मफल भोगणे क्रमप्राप्त आहे.तरी ही काही जीवांची अवस्था..

*जगता जगता जगत राहिलो*

*तरीही उलगडले नाही जगणे*

अशीच असते.

देवकृपा झाली कि जगणे उलगडत जाते आणि कर्म करत राहणे व भोग भोगणे हे आयुष्य आहे.भौतिक सुखांची स्वप्ने पाहताना अनेक गोष्टींची आसक्ती जडते.

आसक्ती हीच अनेक वेळा दुःखाचे मूळ आहे.हे मृगजळ ,ही स्वप्ने काही काळ आनंद देतात.ह्या चांदण्याची शीतलता अनुभवता येते पण हे नश्वर आहे.आपला नश्वर मानव देह भाव भावनांमधे गुंतत जातो.कैक व्यक्ती अनेक नाती वेळोवेळी आपल्या आयुष्यात येतात.प्रत्येक माणूस वेगळा ,नात्यांचे वेगळे कंगोरे…कुणी खरे कुणी खोटे आणि यात मनुष्य गुंततो …गुरफटत जातो.

*भावशब्दांचे अर्थच वेगवेगळे*

*दुरापास्त झाले सत्य कळणे*

आदरणीय अप्पांनी किती सुंदर शब्दांत या अवस्थेचे वर्णन केले आहे.

मानवी मन हे अथांग आहे जेथे अनेक भाव तरंग निर्माण होतात.अनेक विचार मनाला स्पर्शून जातात.अनेक व्यक्तींसोबत आपले ऋणानुबंध जुळतात.अशा अनेक व्यक्ती अनेक नाती मनाला नेहमीच आनंद देऊन जातात.

पण हे *नाते ऋणानुबंधी जणू खेळणे* म्हणजे फक्त आभास …नुसता मनाचा खेळ.

*हिरवळलेल्या वेली कोवळ्या*

हे आदरणीय सरांनी कवितांसाठी योजलेले रुपक आहे असे वाटते.

हे हिरव्या वेलींसम कोवळे मनभावनांचे स्पर्श एका क्षणी गंधित होतात आणि कवितेचा हिरवा अंकुर फुटू लागतो.हा कवितेचा फुलोरा हळू हळू फुलतो व आपल्या मोहक सुगंधाने मनाला अंतर्बाह्य गंधित करतो.

आदरणीय वि. ग. सातपुते सरांची ही कविता अध्यात्माच्या वाटेने जाणारी आहे.मनुष्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. तो भौतिक सुखात आसक्तीत गुरफटलेला असतो.अनुभवाने परिपक्व होऊन जेव्हा मनात अध्यात्माचा चाफा दरवळतो तेव्हा जगणे सुगंधित होत जाते.परमात्म्याचे रुप ,शाश्वत सत्य समोर येऊ लागते.

हे जग ,इथले नातेसंबंध ,येथील स्वप्ने सारेच मृगजळ आहे.हे जगणे फक्त खेळणे होते.चराचर सृष्टीत व्यापून राहिलेल्या ईश्वराचे खरे रूप कळल्यावर जगणे खऱ्या अर्थाने सुंदर होते.आत्मसुख काय आहे हे उमजताना जीवनाची कृतार्थता कळून येते.

 

*सौ. गौरी चिंतामणी काळे* पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा