You are currently viewing सांगलीत राम मंदिर चौक ते महात्मा गांधी चौक मार्गावर ‘महास्वच्छता अभियान’ 

सांगलीत राम मंदिर चौक ते महात्मा गांधी चौक मार्गावर ‘महास्वच्छता अभियान’ 

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान २.०, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत आज, सोमवार दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी राम मंदिर चौक, सांगली ते महात्मा गांधी चौक, मिरज या मुख्य मार्गावर ‘महास्वच्छता अभियान’ राबविण्यात आले.

सकाळी ७ ते १० या वेळेत राबविण्यात आलेल्या या अभियानात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या व दुभाजकांमधील गाजर गवत काढणे, प्लास्टिक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करणे तसेच स्वच्छता केलेल्या ठिकाणी जंतुनाशक पावडरची फवारणी करणे आदी कामे करण्यात आली.

राम मंदिर चौक ते महात्मा गांधी चौक या संपूर्ण मार्गाचे २१ टप्प्यांत विभाजन करून प्रत्येक टप्प्याची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षक व महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आली होती. आयुक्त कार्यालय, अतिरिक्त आयुक्त कार्यालये, सर्व उपायुक्त कार्यालये, सामान्य प्रशासन, भरती व पदोन्नती कक्ष, माहिती व जनसंपर्क, कर, मालमत्ता, बाजार व परवाना, अग्निशमन, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, विद्युत, उद्यान, पर्यावरण, अतिक्रमण, शिक्षण, आरोग्य यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या अभियानात सहभागी झाले.

या महास्वच्छता अभियानात महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व विभागप्रमुख, सन्माननीय सदस्य तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. सर्व विभागांनी समन्वयाने काम करत अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त ठेवणे तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, संस्था आणि विविध संघटनांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा