You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात शस्त्रक्रिया व वैद्यकीय सेवेत डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शस्त्रक्रिया व वैद्यकीय सेवेत डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शस्त्रक्रिया व वैद्यकीय सेवेत डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी!

तीन महिन्यांत सर्वाधिक शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याची राजू मसुरकर यांची मागणी

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या तीन महिन्यांत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या आहेत. विशेषतः सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया व रुग्णसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबद्दल जनरल सर्जन डॉ. गिरीश चौगुले, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. धीरज सावंत, डॉ. भक्ती सावंत, डॉ. अंजना पी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवा आणि शस्त्रक्रियांची आकडेवारी उल्लेखनीय आहे. जनरल सर्जरी विभागात डॉ. गिरीश चौगुले यांनी १५५ शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचबरोबर डॉ. निखिल जाधव यांनी ३४, डॉ. महेंद्र आचरेकर यांनी २५, तर डॉ. अनिलजीत वज्राठकर यांनी १५ शस्त्रक्रिया केल्या आहेत.
स्त्रीरोग विभागातही डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. गायत्री शर्मा यांनी ८४, डॉ. प्रियांका कासार यांनी ७२, डॉ. प्रितम जगताप यांनी ५७, डॉ. संजय विळकर यांनी २९, डॉ. भक्ती सावंत यांनी ८, तर डॉ. मीनल नागवेकर यांनी ७ वैद्यकीय प्रक्रिया केल्या आहेत. याशिवाय अन्य स्त्रीरोगतज्ज्ञांनीही रुग्णांना सेवा दिली आहे.
नेत्रतज्ज्ञ विभागात डॉ. नेहा पावसकर यांनी १०८, डॉ. बाळासाहेब जोशी यांनी १२, तर डॉ. धनंजय भोसले यांनी २० नेत्रसेवा प्रक्रिया केल्या आहेत. जनरल सर्जरी, स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा आणि दंतवैद्यक अशा विविध विभागांमध्ये डॉक्टरांनी रुग्णसेवा बजावली आहे. दंतवैद्यक विभागात डॉ. हुमायूं माने यांनी ४०४, डॉ. समीर धाकोरकर यांनी १९१, तर डॉ. संजय दिगंबर चाटे यांनी १२६ दंत उपचार केले आहेत.
या सर्व कामगिरीमागे डॉक्टरांसोबतच ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान आहे. गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे सर्वजण मेहनत घेत आहेत.
या कार्याबद्दल कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, तसेच जिल्हा रुग्णालय आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही राजू मसुरकर यांनी आभार मानले.
डॉक्टरांची निष्ठा, शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे. अशा डॉक्टरांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा शासनाच्या आरोग्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात यावा, अशी मागणी राजू मसुरकर यांनी केली आहे.
गोरगरीब रुग्णांची अशीच ईश्वरी सेवा डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हातून घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समाधान आणि यश लाभो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा