*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जसे पहावे तशी ही दुनिया*
सौंदर्याची खणी लावणी आहे छप्पन गुणी
छछोर आहे म्हणू नका हो लावण्याची धनी..
जसे पहावे तशी ही दुनिया मनात नको पाप
नजरे पडता कुणी सुंदरी मन ठेवा हातात..
सौंदर्याला मनी टिपावे देवाची ती कृती
रुपाची ती राणी कुणी तर कुणी असे सुमती..
सुंदरता ही मनात असते नजरेचा तो भाव
हातामध्ये जर का नाही कशास ठेवा “नाव”..
हरएक आकृती देवाची सुंदर विविधता हो किती
कुणीच नाही कुणासारखा सुन्नच होते मती..
ज्या नजरेने पहाल ज्याला तसेच दिसते जग
चिमणपाखरे दिसती सुंदर भावे मनाला ढग..
मनमोहक ते फुलपाखरू जाळ्यातील तो कोळी
बटू ही दिसतो किती तो मोहक टिळा लावतो भाळी..
नजरेचा सारा खेळ असे हो जो तो आपल्या जागी
कुरूप घडला कुणी देवाने कुणी घडवला त्यागी..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
