You are currently viewing दादरमध्ये प्रा प्रतिभा सराफ यांची गझल कार्यशाळा
Oplus_16908288

दादरमध्ये प्रा प्रतिभा सराफ यांची गझल कार्यशाळा

दादर / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालय (दादर) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठी भाषा दिना’निमित्त गझल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकारी प्रा. प्रतिभा बिस्वास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर दर्पण फाळके या विद्यार्थिनीने ‘खरा तो एकचि धर्म’ ही प्रार्थना सादर केली. प्रास्ताविकात प्रा. बिस्वास यांनी मराठी भाषेची समृद्ध साहित्यपरंपरा अधोरेखित करत अभिजात मराठी भाषा दिनाचे महत्त्व व उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, प्रसिद्ध गझलकार प्रा. प्रतिभा सराफ यांचा परिचय मराठी विभागातील प्रा. विमुक्ती जाधव यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मार्कंडेय यांच्या हस्ते प्रा. सराफ यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच NSS स्वयंसेवकांनी शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिल मार्कंडेय यांनी विद्यार्थ्यांनी भाषेच्या सामर्थ्याची जाणीव ठेवून साहित्याची आवड जोपासावी व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन केले.

मार्गदर्शन करताना प्रा. प्रतिभा सराफ यांनी गझल या काव्यप्रकाराचे स्वरूप, रचना, लेखनतंत्र आणि भावनांची अभिव्यक्ती यावर सोप्या भाषेत प्रकाश टाकला. दैनंदिन अनुभव गझलेतून कसे मांडावेत, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. केवळ माहिती न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गझल लेखनासाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात आला. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या रचनांचे प्रा. सराफ यांनी कौतुक करून त्यांना पुष्प देऊन प्रोत्साहित केले.

दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत ९८ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रा. साधना पावसकर, प्रा. अंजली हडकर, प्रा. शर्मिला शिंदे, प्रा. गीता, चंद्रमोहन जोशी, प्रा. यशवंत भोरकडे, प्रा. दिपेश मोरे, कवी आदित्य दवणे, NSS अधिकारी श्रद्धा राजे, इंदुमती माळकर व अंकुश दळवी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता मराठी विभागातील प्रा. राहुल पेणकर यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या साहित्यिक जाणिवा समृद्ध करणारी आणि नवोदित लेखकांना प्रेरणा देणारी ठरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा