शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरला; गोविंद शेर्लेकर पतपेढीच्या सावंतवाडी संचालकपदी बिनविरोध
बांदा
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले आणि सावंतवाडी प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे गोविंद गणपत शेर्लेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या;सिंधुदुर्गनगरीच्या सावंतवाडी तालुका सर्वसाधारण संचालकपदी बिनविरोध निवड झाली. भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलच्या माध्यमातून झालेली ही निवड त्यांच्या कार्यावरील शिक्षकांच्या विश्वासाची पावती मानली जात आहे.
सावंतवाडी तालुका सर्वसाधारण मतदारसंघातील संचालक सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी बुधवारी (दि. २१) संचालक मंडळाच्या सभेत निवड प्रक्रिया पार पडली. अध्यासी अधिकारी श्री. अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रक्रियेत श्री. शेर्लेकर यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सीताराम लांबर, उपाध्यक्ष महेंद्र पावसकर, सर्व संचालक तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता.
निवडीनंतर भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल व शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, राज्य पदाधिकारी दादा जांभवडेकर, सचिन मदने, राजू वजराटकर, प्रशांत मडगांवकर तसेच जिल्हा सल्लागार नंदकुमार राणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून श्री. शेर्लेकर यांचे अभिनंदन केले.
शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न आणि हक्कांसाठी काम करताना आता पतपेढीच्या संचालकपदाची नवी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. शिक्षकांचा विश्वास, सहकाऱ्यांची साथ आणि सहकाराची जबाबदारी या त्रिसूत्रीच्या बळावर शिक्षकहिताला प्राधान्य देत काम करण्याची संधी गोविंद शेर्लेकर यांना मिळाली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीचे शिक्षक वर्तुळातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

