कुडाळ नगरपंचायतीच्या सभेत समस्यांचा पाढा; प्रशासनाला नगरसेवकांचा घेराव
फॉगिंग मशीनच्या नियोजनावरून उपनगराध्यक्ष किरण शिंदे आक्रमक; आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी
आठ दिवसांत विशेष सभा घेण्याचे मुख्याधिकारी खंडू पोवळ यांचे आश्वासन
कुडाळ / (प्रतिनिधी) : एकीकडे कुडाळ शहराच्या कचरा डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर असताना आता या कचरा उचलणाऱ्या तब्बल सहा घंटागाड्या गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याची बाब समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नादुरुस्त घंटागाड्यांबाबत अहवाल देण्याचे ठरले असतानाही अद्याप तो अहवाल सादर झालेला नसल्याची बाब आजच्या कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. यामुळे सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर लवकरच यासाठी विशेष सभा लावून निर्णय घेऊ, असे मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी सांगितले.
कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी खंडू पोवळ, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सभेमध्ये एक ४०७ वाहन आणि एक घंटागाडी खरेदी करण्याबाबत विषय सभेत आल्यावर नादुरुस्त घंटागाड्यांचे काय झाले, असा प्रश्न सदस्यांनी विचारला. सध्या सहा घंटागाड्या ठिकठिकाणी बंद अवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीबाबत अहवाल देण्याचे तीन महिन्यांपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत ठरले होते, याची आठवण नगरसेवक मंदार शिरसाट यांनी करून दिली. तीन महिने होऊनही नगरपंचायत प्रशासनाने अहवाल सभेसमोर ठेवला नाही. याबाबत सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
घंटागाड्यांच्या दुरुस्तीची बिले कोण देणार, हा मुद्दाही चर्चेत आला. उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी यावर नाराजी व्यक्त केली. तर गाड्या बंद आहेत, याविषयी आम्हाला विश्वासात का घेतले जात नाही, अशी विचारणा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी केली. आठ दिवसांत विशेष सभा लावून तोडगा काढू, असे मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी सांगितले.
शहरात मच्छरांचा उपद्रव वाढला असून फॉगिंग मशीनचे प्रभागनिहाय योग्य नियोजन केले जात नसल्याबाबत उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ फोटो काढून दाखवण्यापुरता फॉगिंग मशीनचा वापर न करता नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष उपयोग झाला पाहिजे. सर्व वॉर्डमध्ये फॉगिंग मशीनचा वापर झाला पाहिजे, असे किरण शिंदे यांनी सांगितले. नगरपंचायतीचा आरोग्य विभाग उदासीन आहे का, असा सवाल करत त्यांनी सर्व प्रभागांत फॉगिंग मशीनचा समान वापर होण्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
दरम्यान, एमआयडीसी येथील घनकचरा प्रकल्प, त्यामध्ये बसविण्यात येणारी यंत्रसामग्री, शेड याविषयीही सभागृहात चर्चा झाली. नगरपंचायतीची वाहने धुण्यासाठी सव्हिसिंग पंप घेणे, रस्त्यावरील कचरा हटविण्यासाठी ब्लोअर खरेदी करणे, जेसीबी खरेदी करणे आणि त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे, याविषयी चर्चा करण्यात आली.
शहरात विद्युत खांब असलेल्या ५५ ठिकाणी पथदीवे नाहीत, ही बाब बैठकीत समोर आली. यावर चर्चा करण्यात आली. शहरात नोंदणीकृत २३४ पथविक्रेते आहेत. त्यांना जागा आणि ओळखपत्र देताना स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेच्या शेवटी मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी आपल्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण देताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नये, असे आवाहन केले. आपली नियुक्ती ऑक्टोबर २०२६ पर्यंत असली तरी त्यात ‘पुढील आदेश येईपर्यंत’ असाही पर्याय आहे. त्यामुळे आपल्या नियुक्तीच्या मुदतीबाबत चुकीची माहिती कोणी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. याला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनीदेखील दुजोरा दिला.
