You are currently viewing किती गोड गं तू

किती गोड गं तू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.प्रतिभा हरणखेडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

किती गोड गं तू

 

किती किती गोड गं तू कविते!

फुलपाखरांचे पंख लेवून

उतरतेस माझ्या मनाच्या काळ्या भुसभुशीत माती मध्ये

गाडून घेतेस स्वतःला, फुटतेस, रुजतेस हळुवारपणे

मग डोकावतो शब्दाचा एक एक कोंभ तान्हुला.

भावनांचे सूर्य किरण जोजवती झुला आणि शब्दांचे झंकार खेळवतात तुला.

मग उगवते कविते एक एक ओळ-कळी तुझ्या अंगोपांगी

आणि खुलत,उमलत जाते एक एक पाकळी.

बहर आला की फुलून येते कवितेचे झाड. मोराच्या पिसा-या परी.

सौंदर्याचा एक एक अलंकार चढविते मी तुझ्या मादक मोहक कमनीय अवयवांवरी

आणि दरवळतो तुझा सुगंध दाही दिशांवरी.

तव पदी बांधते पैंजण दव बिंदुंचे अन् ओठात लालित्य मधु थेंबांचे.

मी होते मोकळी तुला नटवण्या सजवण्यातून.

आणि मिरविते तुजला रसिकांच्या झुबक्या झुबक्यातून.

 

डॉ.प्रतिभा अभिनय हरणखेडकर, जळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा