You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीच्या बुद्धिबळ स्पर्धेला ५५ विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

मुक्ताई ॲकेडमीच्या बुद्धिबळ स्पर्धेला ५५ विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

मुक्ताई ॲकेडमीच्या बुद्धिबळ स्पर्धेला ५५ विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

सुहास सातोसकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन; चिमुकल्या अवधूतने वेधले लक्ष, राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

सावंतवाडी

विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासकीलवाडा येथील राजवाड्याजवळील पाटणकर वाड्यातील ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा पार पडली. अवघ्या ४ वर्षे ९ महिन्यांचा ॲकेडमीचा सर्वांत लहान खेळाडू अवधूत गावडे याच्या सहभागाने विशेष लक्ष वेधले.
स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी रोटरी क्लबचे सचिव सुहास सातोसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा सम्राट इंटरनॅशनल क्लबचे भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, मुंबई येथील जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या संचालिका अनुपमा शेटगे उपस्थित होत्या. तसेच मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.

मुक्ताई ॲकेडमीची दशकभरातील उल्लेखनीय कामगिरी
ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी संस्थेच्या दहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कालावधीत ॲकेडमीने बुद्धिबळातील ३७ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू, तसेच कॅरममधील १६ राज्यस्तरीय आणि तीन राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. सावंतवाडीसह कुडाळ, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड येथील विद्यार्थ्यांनाही ॲकेडमीमार्फत प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील पहिले राज्य पंच आणि राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, यश सावंत, पुष्कर केळूसकर, गार्गी सावंत, अथर्व वेंगुर्लेकर, नऊ वर्षीय पूर्वांक कोचरेकर, विघ्नेश अंबापूरकर आणि सहा वर्षीय दिव्यांका नार्वेकर या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.

मोबाईलपासून दूर राहून बुद्धिबळाकडे वळा : सुहास सातोसकर

अध्यक्षीय मनोगतात सुहास सातोसकर यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या कार्याचे कौतुक केले. बुद्धिबळासारखे खेळ विद्यार्थ्यांची एकाग्रता, विचारक्षमता आणि निर्णयक्षमता वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून अशा बौद्धिक खेळांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. मुक्ताई ॲकेडमीच्या सहकार्याने रोटरी क्लबतर्फे लवकरच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
हरिश्चंद्र पवार यांनी ॲकेडमीच्या खेळाडू घडविण्याच्या कार्याचे कौतुक केले. सम्राट क्लबच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-गोवा बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
पहिली ते चौथी गटातील स्पर्धेची पारितोषिके रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण परब यांनी पुरस्कृत केली आहेत. कार्यक्रमाला पालक डॉ. मुकुंद अंबापूरकर, किरण सावंत, मंदार ठाकूर, विनायक नार्वेकर, संजय राऊळ यांच्यासह पालक आणि बुद्धिबळप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सरचिटणीस स्नेहा पेडणेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा