विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
विजयादशमी ( दसरा ) पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विटा शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी विटा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. पालखी मार्गांवर व परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी नगरपरिषदेचे मॉर्निंग पथक पहाटे ५ वाजल्यापासून विविध महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
शहरातील गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विटा कोर्ट परिसर, विटा बसस्थानक, सावरकर नगर, श्रेयस भवन, मार्केट यार्ड, पालखी मैदान यांसह पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी पथकाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
पालखी मार्गांवर कचरा टाकणे, थुंकणे किंवा इतर प्रकारे अस्वच्छता निर्माण करणे अशा बाबींवर मॉर्निंग पथकाची नजर राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबरोबरच नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, यासाठीही जनजागृती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यभर प्रसिद्ध असलेल्या विटा आणि रेवा नगर च्या पालखी शर्यतीच्या मार्गाची नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, सहकारी नगरसेवक आणि अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. संपुर्ण पालखी मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याचे आणि स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दोन दिवसापूर्वी दिले होते. त्याची पुर्तता झाली आहे का यासाठी पाहणी दौरा केला. पालखी शर्यत संपते ते लिंगायत समशानभुमीचे मैदान अर्धे स्वच्छ न करता पुर्ण स्वच्छ करावयास सांगितले होते त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी चांगली स्वच्छता करुन घेतली आहे. पालखी शर्यतीत सहभाग घेणाऱ्या सर्व नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून शर्यत पार पाडावी तसेच दर्शक असणाऱ्या नागरिकांनी सुद्धा पालखी मार्गावर स्वच्छता राखावी असे त्यांनी आवाहन केले. या पाहणी वेळी सहकारी नगरसेवक संजय भिंगारदेवे , विशाल तारळेकर, राम भिंगारदेवे, रणजीत दादा पाटील उपस्थित होते
