You are currently viewing बा. भो. शास्त्री यांच्या ‘मार्गस्थ : भाग तिसरा’ आत्मचरित्राचे महाक्षेत्र डोमेग्राममध्ये प्रकाशन

बा. भो. शास्त्री यांच्या ‘मार्गस्थ : भाग तिसरा’ आत्मचरित्राचे महाक्षेत्र डोमेग्राममध्ये प्रकाशन

डोमेग्राम / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

महानुभाव पंथाचे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संशोधक बा. भो. शास्त्री लिखित बहुचर्चित आत्मचरित्र ‘मार्गस्थ : भाग तिसरा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा श्रीरामपूर तालुक्यातील महाक्षेत्र डोमेग्राम येथील ऐतिहासिक राजमठात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रकाशन सोहळ्यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, कवीश्वर कुलाचार्य, आचार्य प्रवर, महंत श्रीविद्वांस बाबा यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या हस्ते प्रकाशन होणे हा बा. भो. शास्त्री यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रसंगी मंचावर महानुभाव पंथाचे थोर अभ्यासक साहित्याचार्य संतोषमुनी शास्त्री, सामाजिक कार्यकर्ते राजूदादा सातारकर, जेष्ठ साहित्यिक, अभ्यासक धनंजय लोणारकर तसेच प्रकाशक विलास फुटाणे उपस्थित होते.

याप्रसंगी महंत विद्वांस बाबा बा. भो. शास्त्री यांच्या कार्याचा आढावा घेतना म्हणाले, बा. भो. शास्त्री यांनी आपले संपूर्ण आयुष्य महानुभाव साहित्याच्या सेवेसाठी, संशोधनासाठी आणि संवर्धनासाठी वेचले आहे. आधुनिक महाराष्ट्राला महानुभाव पंथाचे साहित्य वैभव, वैचारिक वैभव आणि सामाजिक तत्वज्ञान समजावून सांगण्याचे महान कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून केले आहे. त्यांचे लिखाण हे केवळ साहित्य नसून, एक सामाजिक दस्तऐवज आहे.

महंत पुढे म्हणाले, एक कटू सत्य सांगावेसे वाटते, महानुभाव पंथाने बा. भो. शास्त्री यांना पाहिजे तेवढी प्रतिष्ठा, पाहिजे तेवढा सन्मान कदाचित दिला नाही. मात्र, बा. भो. शास्त्री यांनी मात्र महानुभाव पंथाला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी सामाजिक प्रतिष्ठा, ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे संपूर्ण महानुभाव पंथ त्यांचा सदैव ऋणी राहील. उद्या जर महानुभाव पंथाचा खरा इतिहास लिहायचा झाला तर त्या इतिहासात सर्वात जास्त पाने ही बा. भो. शास्त्री यांच्या कार्याची आणि त्यांच्या साहित्याची असतील.

साहित्याचार्य संतोषमुनी शास्त्री म्हणाले, मार्गस्थ हा ग्रंथ केवळ बा. भो. शास्त्री यांचे आत्मचरित्र नसून, तो महानुभाव साहित्याचा गेल्या पन्नास वर्षांचा जिवंत इतिहास आहे. त्यांनी भोगलेले कष्ट, केलेला संघर्ष आणि टिकवलेली निष्ठा, ही आजच्या तरुण साहित्यिकांसाठी प्रेरणादायी आहे.

प्रकाशक विलास फुटाणे म्हणाले, बा. भो. शास्त्री यांचे साहित्य हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपूर्ण आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांचे ‘मार्गस्थ’ चे तिन्ही भाग वाचकांनी डोक्यावर घेतले आहेत. त्यांचे पुढील साहित्य प्रकाशित करण्याची संधी आम्हाला मिळणे, हे आमचे भाग्यच आहे. राजूदादा सातारकर, कपाटे आणि धनंजय लोणारकर यांनीही आपल्या भाषणातून शास्त्री यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.

बा. भो. शास्त्री यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. या ग्रंथ लेखनामागील प्रेरणा, आलेले अडथळे आणि मिळालेले सहकार्य, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी परिसरातील श्रोते, भाविक, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा