You are currently viewing मालवणमध्ये बीच लोककला महोत्सवाला सुरुवात

मालवणमध्ये बीच लोककला महोत्सवाला सुरुवात

मालवणमध्ये बीच लोककला महोत्सवाला सुरुवात

कोकणची संस्कृती, लोककला आणि पर्यटनाला प्रोत्साहन

 

सिंधुदुर्ग

कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या पारंपरिक कलांचा जागर आणि समुद्रकिनाऱ्याच्या रमणीय वातावरणात लोककलेचा आनंद देणाऱ्या दोन दिवसीय ‘बीच लोककला महोत्सवा’ला शनिवारी मालवण येथे उत्साहात सुरुवात झाली. मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर’ यांच्या दशावतार नाट्यप्रयोगाने रसिकांची मने जिंकली.

            कोकणातील संस्कृती, लोककला आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन शासनाकडून करण्यात आल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवातून कोकणातील समृद्ध परंपरा आणि लोककलांना व्यापक व्यासपीठ मिळत आहे. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळण्यासोबतच पर्यटकांना कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

            महोत्सवातील पहिल्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरलेल्या दशावतार नाट्यप्रयोगात लोक राजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत, तीन पिढ्यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या ‘श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर’ यांनी पौराणिक कथांवर आधारित नाट्य सादर केले. रंगीबेरंगी वेशभूषा, दमदार संवाद आणि प्रभावी अभिनयातून कलाकारांनी दशावतार कलेचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडविले. विविध नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाला नागरिक आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

            महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दशावतारासह लावणी, पोवाडा, लोकगीते, गोंधळ आणि अन्य पारंपरिक कलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव रसिकांना मिळणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारण्यात आला आहे.

            उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती पूनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर, नगरसेविका नीना मुंबरकर, मेघा गावकर, चित्रा हरमलकर, अश्विनी कांदळगावकर, शरवरी पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, ललित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्या सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रणय तेली यांनी प्रास्ताविक केले, तर कोमल शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले. स्थानिक लोककलांचे जतन व संवर्धन, कलाकारांना व्यासपीठ आणि पर्यटनाला सांस्कृतिक जोड देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा