आम. नीलेश राणे यांच्या प्रयत्नांतून कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार – अभिषेक गावडे
कुडाळ / प्रतिनिधी : शहरातील कचऱ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, तो सोडवण्यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या कामाला अधिक गती मिळाली आहे. त्यामुळे या समस्येचे राजकीय भांडवल करून जनतेला भडकवण्याऐवजी शहराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन शिवसेनेचे कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आंदोलन करण्यापेक्षा तोडगा काढण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचे गावडे यांनी नमूद केले. कचरा डेपोच्या प्रश्नावरून जनआंदोलनाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कचरा डेपो बंद पाडून किंवा प्रशासनाच्या कामात अडथळे आणून हा प्रश्न सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुडाळ शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. आमदार नीलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसी परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करण्यापासून ते आवश्यक यंत्रसामग्री बसविण्यापर्यंतच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गावडे यांनी केले.
नगरपंचायतीवर सुरुवातीची तीन वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. त्या काळात त्यांचे मंत्री, खासदार आणि आमदार सत्तेत असतानाही कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न प्रलंबित का राहिला? एमआयडीसीतील प्रकल्पासाठी ठोस कार्यवाही का झाली नाही? असे सवाल उपस्थित करत गावडे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.
आता हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना केवळ राजकीय फायद्यासाठी आंदोलन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असताना त्यांना सहकार्य करण्याऐवजी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे सांगतानाच आमदार नीलेश राणे यांच्या प्रयत्नांतून कुडाळ एमआयडीसीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्णत्वास जाईल, असा विश्वास अभिषेक गावडे यांनी व्यक्त केला.
