You are currently viewing मुंबई येथे कवयित्री डॉ. मानसी अशोकराव पाटील सायन यांचा औचित्यपूर्ण काव्यसंमेलन सोहळा

मुंबई येथे कवयित्री डॉ. मानसी अशोकराव पाटील सायन यांचा औचित्यपूर्ण काव्यसंमेलन सोहळा

मुंबई :

३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या काव्यसंमेलनाचे आयोजन माझ्या भगिनी डॉ. मानसी ताई पाटील यांच्याकडून करण्यात आले होते.

मानसी ताईंचे आयोजन असल्याचे समजताच हा सोहळा माझ्यासाठी वेगळा ठरला.मानसी ताईंचे पतीराज अर्थात माझे भाओजी, मुलगा चिन्मय आणि सून कीर्ती यांनीही आयोजनाला मनापासून हातभार लावला. माझी लाडकी नात रावी तिच्या निरागस हसऱ्या वावराने घरातील वातावरण अधिक प्रसन्न करत होती.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कीर्तीचे बाबा पाबरेकर यांनी केलेले निवेदन अत्यंत सुरेख होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. ॲड. प्रार्थना सदावर्ते यांचे आतिथ्यपर मनोगत विचारांना समृद्ध करणारे होते. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या कवितेने वातावरणात काव्यात्मक रंग भरला.

काव्यसंमेलनाचे दोन्ही भाग विविध प्रासादिक रचनांनी समृद्ध झाले. कवी-कवयित्रींच्या रचनांतून प्रेम, वेदना, सामाजिक भान, अनुभव आणि जीवनदृष्टीचे वेगवेगळे पैलू उलगडले. प्रत्येक सादरीकरणानंतर मिळणारी उत्स्फूर्त दाद वातावरण अधिक खुलवत होती.

सुमंगल सोसायटीत सायन मुंबई येथील रहिवाशांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत काव्यवाचनाचा मनमुराद आनंद घेतला.

ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी मा. वि. ग. सातपुते (विगसा) उर्फ आप्पा यांचे अध्यक्षीय मनोगत अनुभवसंपन्न आणि विचारप्रवर्तक होते. त्यांच्या निरीक्षणांतून साहित्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या भावनात्मक कवितेने संमेलनाला आणखी एक संस्मरणीय क्षण दिला.

यानंतरचे स्नेहभोजन मनमोकळ्या गप्पांचे निमित्त ठरले.

भोजनानंतर वातावरण अधिकच मोकळे झाले. किस्से, विनोद आणि गाण्यांची मैफल रंगली. मानसी ताई, कवीवर्य मिलिंद जोशी , बंडा जोशी, सुधीर कुबेर तसेच श्री व सौ . घाणेकर आणि सर्व कविवरांनी अक्षरशः धम्माल केली.

त्याच वेळी विगसा अर्थात आप्पांच्या अर्धांगिनींनी एक गमतीदार आठवण सांगितली. लग्नाला पन्नास वर्षे झाली; पण या प्रदीर्घ सहजीवनात त्यांनी आप्पांना गाताना तर सोडाच, साधे गुणगुणतानाही ऐकलेले नाही.

मात्र त्या दिवशी आप्पांनी चक्क ताल-सुरात काव्य सादर केले! इतक्या प्रदीर्घ सहजीवनात प्रथमच ऐकायला मिळालेला हा स्वर साऱ्यांसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा विषय ठरला.

साहित्यिक अनुभव , कुटुंबीयांचा सहवास, परिसरातील सहभाग आणि गाण्यांनी रंगलेली सांगता यांनी ३ ऑक्टोबरला विशेष अर्थ दिला.

 

*काही कार्यक्रम आठवणीत राहतात.*

*काही माणसे मनात राहतात.*

*आणि काही भेटी आयुष्याला नवी ऊब देऊन जातात.*

प्रार्थना सदावर्ते आणि वि. ग. सातपुते यांचे विचार , तसेच उपस्थित मान्यवर कवी-कवयित्रींच्या रचना, सुमंगल सोसायटीतील रहिवाशांचा सहभाग, स्नेहभोजनानंतरची धमाल आणि विगसाआप्पांचे अनपेक्षित गायन—या साऱ्या क्षणांनी ३ ऑक्टोबरच्या स्मृती मोहरुन गेले.

डॉ.मानसी ताई कुटुंबाचे आयोजन अत्यंत आत्मियतेचे होते त्यांना मनापासून धन्यवाद.

 

*— गुरुदत्त दिनकर वाकदेकर*

*संस्थापक अध्यक्ष*

*मराठी साहित्य व कला सेवा मुंबई ( महाराष्ट्र)*

प्रतिक्रिया व्यक्त करा