कुडाळ :
शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करताना जीवन जगण्याची दिशा देतात. कोणत्या दिशेने जायचे हे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मार्गक्रमण केले तर यशस्वी होता येईल. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा.” असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र शासनाच्या ‘चला शाळेत जाऊया अभियाना’ अंतर्गत कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल ला भेट देत असताना विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने चालविलेल्या व त्यांच्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या या शिक्षण संस्थेमध्ये वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या मंत्रावर श्रद्धा ठेवून, चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी जे उत्तम पद्धतीने काम करत आहे.त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. व विद्यार्थ्यांना व संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चला शाळेत जाऊया या अभियाना निमित्त बॅरिस्टर नाथ पै सेंटर स्कूलमध्ये आलेल्या दादासाहेब भुसे यांचे संस्थेतर्फे शाल श्रीफळ व शिवराज मुद्रा देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी भुसेंच्या सोबत चेअरमन उमेश गाळवणकर, शिवसेना ओबीसी व्ही. जे. एन टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. श्रीधर सगुण पेडणेकर, जि प च्या माजी अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, जि प चे माजी जिल्हाध्यक्ष काका कुडाळकर, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, जि प सदस्य रुपेश कानडे कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, प्राथमिक शालेय प्रभारी शिक्षणाधिकारी सविता परब, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर व शिक्षण खात्याचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानानिमित्त आलेल्या दादासाहेब भुसे यांच्या स्वागता निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी दादा भुसे यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध स्वागताबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत. एनसीसी बरोबर या शिक्षण संस्थेमधील इतर कौशल्य युक्त उपक्रमामध्ये, कोर्समध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.
