सोलापुर / प्रदीप जोशी (ज्येष्ठ पत्रकार) :
एखादा दिवस साहित्य प्रेमींसाठी आणि नव्याने लेखन विश्वात पाऊल ठेवणाऱ्या नवलेखक नवकवींसाठी अत्यंत आनंदाचा आणि प्रेरणादायी असतो. त्यांच्या लेखनकलेला मार्गदर्शन मिळत असते. दर्जेदार लेखनासाठी त्याचा उपयोग होत असतो. असे उपक्रम ठीकठिकाणी होत असतात. त्याला प्रतिसाद व पाठबळ मिळाले तर सकस साहित्याची निर्मिती होवू शकते. असाच एक उपक्रम सोलापुरात झाला.
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे नवलेखक आणि नवकवींसाठी कार्यशाळा सारस्वत मंगल कार्यालयालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना कथा, कविता, गद्यलेखन अशा विविध साहित्य प्रकारांचे महत्त्व किती मोठे आहे याची नव्याने जाणीव या कार्यशाळेत साहित्यिकांना झाली. लेखन केवळ मनातील भावना कागदावर उतरविणे नसते. त्यामागे आशयाची स्पष्टता, भाषेचे भान, शास्त्रीय मांडणी, सामाजिक जाणिवा आणि वाचकांच्या मनापर्यंत पोहोचण्याची ताकद असणे आवश्यक असते. लेखनाची योग्य पद्धत कोणती, साहित्याची शास्त्रीय मांडणी कशी करावी, शब्दांना प्रभावी आशयाची जोड कशी द्यावी आणि समाजाला रुचेल, पचेल तसेच समाजमनाला विचार करायला प्रवृत्त करेल असे दर्जेदार साहित्य कसे निर्माण करावे याचे अत्यंत सुंदर आणि मोलाचे मार्गदर्शन या कार्यशाळेत मिळाले. नवलेखक आणि नवकवींना त्यांच्या लेखन प्रवासाची योग्य दिशा देणारी, लेखनातील बारकावे समजून घेण्याची दृष्टी देणारी आणि साहित्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची प्रेरणा देणारी ही कार्यशाळा निश्चितच अविस्मरणीय ठरली. शब्दांची ताकद समजली की लेखणीला दिशा मिळते.आणि लेखणीला दिशा मिळाली की समाजमनाला स्पर्श करणारे साहित्य जन्माला येते. आजच्या या सुंदर आणि ज्ञानसमृद्ध कार्यशाळेने लेखनासाठी नवी ऊर्जा, नवी दृष्टी आणि नवी प्रेरणा दिली. हा अनुभव उपस्थितानी मनात जपून ठेवावा असाच आहे.
